News Flash

भारतातील शहरे सर्वाधिक प्रदूषित

जगातील पहिल्या वीस प्रदूषित शहरांत भारताची १४ शहरे

जगातील पहिल्या वीस प्रदूषित शहरांत भारताची १४ शहरे

दिल्ली व वाराणसी यासह एकूण १४ भारतीय शहरे ही जगातील सर्वात जास्त प्रदूषित असलेल्या पहिल्या वीस शहरांमध्ये आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात दिसून आले आहेत. २०१६ मधील पीएम २.५ कणांच्या प्रमाणानुसार प्रदूषणाचे मापन करण्यात आले आहे. जगातील १० पैकी ९ जण प्रदूषित हवा शरीरात घेत असतात, असे सांगून अहवालात पीएम २.५ प्रदूषकांचे जास्त प्रमाण असलेल्या शहरांची नावे दिली आहेत. त्यात कानपूर, फरिदाबाद, गया, पाटणा, आग्रा, मुझफ्फपूर, श्रीनगर, गुरगाव, जयपूर, पतियाळा, जोधपूर यांच्या पाठोपाठ अली सुबाह अल सालेम (कुवेत) तसेच चीन व कंबोडियातील काही शहरांचा समावेश आहे. पीएम १० (पार्टिक्युलेट मॅटर) पातळीचा विचार करता पहिल्या २० प्रदूषित शहरांत भारतातील तेरा शहरे आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे, की आग्नेय आशियातील देशांनी प्रदूषणावर गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज आहे. यात भारताचा समावेश आहे. या देशांमध्ये ३४ टक्के म्हणजे ७० लाखांपैकी २४ लाख मृत्यू दरवर्षी घरातील व घराबाहेरील हवा प्रदूषणाने होत आहेत. जगात घरातील  हवाप्रदूषणाने ३८ लाख मृत्यू दरवर्षी होतात. त्यात ४० टक्के म्हणजे १५ लाख घरगुती प्रदूषण मृत्यू हे आग्नेय आशियातील देशात होतात.

बाहेरील हवा प्रदूषणामुळे जगात ४२ लाख मृत्यू दरवर्षी होतात. त्यातील ३० टक्के म्हणजे १३ लाख मृत्यू हे आग्नेय आशियात होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार पीएम १० व पीएम २.५ पातळय़ांमध्ये  १०८ देशांतील ४३०० शहरांचा विचार करण्यात आला. २०६ मध्ये ४२ लाख मृत्यू घराबाहेरील प्रदूषणाने, तर ३८ लाख मृत्यू घरातील इंधने व इतर कारणांमुळे असलेल्या प्रदूषणामुळे झाले आहेत.

हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांमुळे या भागात एकूण ७० लाख लोक दरवर्षी मरतात. त्यात त्यांना पक्षाघात, हृदयविकार, फुफ्फुसाचा कर्करोग यासारखे रोग जडतात. हवाप्रदूषणामुळे होणारे ९० टक्के मृत्यू हे कमी व मध्यम उत्पन्नाच्या भागात म्हणजे भारत, आशिया व आफ्रिकेत तसेच युरोप, पूर्व भूमध्य सागरी प्रदेश व अमेरिकेतील कमी व मध्यम उत्पन्न गटातील भागात होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार अजूनही जगात ४० टक्के म्हणजे ३ अब्ज लोकांना स्वच्छ इंधन उपलब्ध नाही. एकूण २४ टक्के मृत्यू हे असंसर्गजन्य रोगांमध्ये होत असून त्यात २५ टक्के पक्षाघात, ४३ टक्के श्वासाचे विकार व २९ टक्के फु फ्फुसाचा क र्करोग ही कारणे आहेत.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनासारख्या उपक्रमांनी भारतात ३७ दशलक्ष महिलांना मोफत एलपीजी जोड मिळाले असून, त्याचा फायदा स्वच्छ इंधनासाठी होत आहे. भारतात २०२० पर्यंत ८० दशलक्ष कुटुंबांना एलपीजी जोड देण्याचे उद्दिष्ट आहे याची अहवालात नोंद घेतली आहे. स्वच्छ इंधनासाठी प्रयत्न सुरू असले तरी जगात ६० टक्के लोकांना ते उपलब्ध नाही. घरातील व बाहेरील हवा प्रदूषणाचा परिणाम रोखला नाही तर त्याचे आणखी गंभीर परिणाम होतील, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया संचालक पूनम खेतरपाल सिंह यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 1:23 am

Web Title: air pollution in india 4
Next Stories
1 कसौलीत महिला अधिकाऱ्याच्या हत्येची सुप्रीम कोर्टाकडून दखल
2 फेसबुकवर ट्रम्प यांच्यापेक्षा मोदी अधिक लोकप्रिय
3 बेळगावात यापुढे महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय अवघड : कन्नड कृती समिती
Just Now!
X