पर्यावरण मंत्री कैलाश गहलोत यांची माहिती

नवी दिल्ली : दिवाळीनंतरची दिल्ली येथील हवा गुणवत्ता पातळी ही २०१८मधील दिवाळीनंतरच्या हवा गुणवत्ता पातळीपेक्षा अधिक चांगली आहे. दिल्लीतील पर्यावरण मंत्री कैलाश गहलोत यांनी सोमवारी ही माहिती दिली.

दिल्ली येथे एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी लोकांनी फटाक्यांचा वापर कमी केला आहे. त्यामुळेच यावर्षी दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगली आहे. पर्यावरणमंत्री म्हणून मी हे म्हणत नाही तर हवेची गुणवत्ता जाणून घेण्यासाठी ज्या ज्या लोकांना मी भेटत आहे, त्या सर्वानी हा प्रतिसाद दिला आहे.

रविवारी दिवाळी साजरी करताना फटाक्यांचा वापर कमी केल्याबद्दल त्यांनी दिल्लीकरांचे आभार मानले आहेत. दिवाळीनंतर सोमवारी सकाळी  देशाच्या राजधानीची हवा गुणवत्ता सर्वात खराब झाली. मात्र, गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत ही परिस्थिती चांगली होती, असे सरकारी यंत्रणांचे म्हणणे आहे. गेल्यावर्षी दिवाळीनंतर दिल्लीच्या हवा गुणवत्ता यंत्रणेने ६०० गुणांची मर्यादा ओलांडली होती. जी सुरक्षा पातळीपेक्षा १२ पट अधिक आहे. २०१६ मध्ये हवा गुणवत्ता पातळी ही ४२५ तर २०१७ मध्ये ती ३६७ इतकी होती. गेल्यावर्षीच्या दिवाळीत वापरण्यात आलेल्या फटाक्यांपेक्षा यावर्षी वापरण्यात आलेले फटाके कमी होते, यात कोणतेही दुमत नाही. फटाके फोडण्यासाठी घालून देण्यात आलेल्या नियमांची अंमलबजावणी योग्यप्रकारे केली आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना अंमलबजावणी ही वेगळी गोष्ट आणि वर्तनात्मक बदल ही दुसरी गोष्ट आहे, असे कैलाश गहलोत म्हणाले.

पुढील वर्षी लोक दिवाळी सण साजरा करताना पर्यावरणाविषयी ते अधिक संवेदनशीलता दर्शवतील. मंत्रालयाची चमू नियमित तपासणी करीत असून कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. हवा गुणवत्ता पातळी सामान्य ठेवण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. दिल्ली सरकार लवकरच आकडेवारी जाहीर करेल, असे कैलाश गहलोत यानी सांगितले.