पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवायला सुरूवात केली आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांना लक्ष्य केल्याचं वृत्त आहे. पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या या कारवाईत शेकडो दहशतवादी ठार झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, भारताने केलेल्या या हल्ल्याचे काही फोटो खुद्द पाकिस्तानकडूनच जारी करण्यात आले आहेत. पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी भारताने केलेल्या बॉम्ब हल्ल्याचे फोटो ट्विट केले आहेत.


‘भारतीय हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली आणि बॉम्बहल्ला केला’ असं गफूर यांनी म्हटलं. ‘पण भारताने टाकलेले बॉम्ब निर्जन ठिकाणी पडले, त्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही, किंवा इतर कोणतही नुकसान झालं नाही. पाकिस्तानच्या हवाई दलाने भारताला तातडीने जोरदार प्रत्युत्तर दिलं, त्यामुळे निर्जन ठिकाणी बॉम्ब टाकून भारताची विमानं परत पळाली’ असा दावाही गफूर यांनी केला आहे.


दरम्यान, या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली असून पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने तातडीची बैठक बोलावली आहे.