जेट एअरवेज बंद झाल्यानंतर नोकरी गेलेल्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना एअर विस्ताराने मदतीची हात दिला आहे. विस्ताराने जेटच्या ५५० कर्माचाऱ्यांना आपल्यामध्ये सामिल करुन घतले आहे. यापूर्वी स्पाईसजेटनेही जेटच्या कर्माचाऱ्यांना नोकरी देऊ केली आहे.

विस्ताराने समावून घेतलेल्या ५५० कर्मचाऱ्यांमध्ये १०० पायलट्सचा समावेश आहे. लवकरच एअर विस्तारा आणि एअर एशिया जेटची विमानं आपल्या ताफ्यात समाविष्ट करुन घेणार आहेत. दरम्यान, जेट एअरवेजने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठीची आजपासूनच मेडिक्लेमची सुविधाही बंद केली आहे.

टाटा समुहाच्या मालकीच्या एअर विस्ताराने जेट एअरवेजच्या ४५० केबिन क्रू कर्मचाऱ्यांना आपल्याकडे नोकरी दिली आहे. त्याचबरोबर एअर इंडिया, स्पाइसजेट, गो एअर या विमान कंपन्याही जेटच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. एअर एशिया जेटचे बोईंग ७३७ आपल्या ताफ्यात समावून घेणार आहे.

दरम्यान, जेट एअरवेजचे मुख्य लोक अधिकारी राहुल तनेजा यांनी सांगितले की, आमचा आशावादी दृष्टीकोन अद्यापही कायम आहे. यासाठी आम्ही अजूनही योग्य संधीची वाट पाहत आहोत. कर्ज देणाऱ्यांशी अद्यापही चर्चा सुरु आहे, बोली प्रक्रियेत आमचा त्यांना पाठींबा आहे.