विमान प्रवासादरम्यान पायलटची छोटीशी चूक किती महागात पडू शकते हे ऑस्ट्रेलियाच्या हवाई वाहतूक सुरक्षा विभागाच्या चौकशीतून समोर आले आहे. पायलटने चुकीची माहिती टाकल्याने विमान भलत्याच दिशेने गेले. या गोंधळात विमानाने तब्बल ११ हजार किलोमीटरचे अंतर कापले आणि शेवटी सिडनीवरुन क्लालांपूरला निघालेले विमान पुन्हा ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्न विमानतळावर लँड झाले.
एअर एशियाचे एक विमान १५ मार्च २०१५ मध्ये सिडनी विमानतळावरुन क्वालालांपूरच्या दिशेने रवाना झाले. या विमानातून २१२ प्रवासी प्रवास करत होते. टेक ऑफपूर्वी पायलटनचे विमानातील नॅव्हिगेशन सिस्टममध्ये चुकीची टाकल्याचे ऑस्ट्रेलियातील सुरक्षा विभागाच्या चौकशीतून समोर आले आहे. दीड वर्षानंतर या घटनेचा सविस्तर अहवाल समोर आला आहे.  नियमाप्रमाणे टेकऑफपूर्वी विमानाचा कॅप्टन विमानाची बाहेरुन पाहणी करतो. यादरम्यान कॉकपिटमध्ये बसलेला पायलट हा प्लॅनच्या उड्डाणाच्या दिशेविषयी माहिती अपलोड करतो. मात्र १५ मार्च २०१५ रोजी सिडनी – मलेशिया विमानाच्या पायलटने नेव्हिगेशन सिस्टममध्ये चुकीची माहिती टाकली. टेक ऑफ दरम्यान इशारा देणारा अलार्मही वाजला. मात्र पायलटने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. यामुळे उड्डाणानंतर विमानाची दिशाच बदलली. विमान तब्बल ११ हजार किलोमीटर चुकीच्या दिशेने गेले. यामुळे नेव्हिगेशन सिस्टम कोलमडली आणि विमानाला शेवटी सिडनीत परतण्याचे निर्देश देण्यात आले.
विमानातल्या प्रवाशांवरील संकट इथेच संपले नाही. सिडनीतील खराब हवामानामुळे विमानाला शेवटी मेलबर्नमध्ये लँडिग करण्याचे निर्देश दिले. विमान मेलबर्नमध्ये लँड होताच सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. तीन तास मेलबर्न विमानतळावर विमान थांबले होते. ऑस्ट्रेलियातील हवाई वाहतूक सुरक्षा विभागाच्या अहवालानंतर एअर एशियाने पत्रक काढून स्पष्टीकरण दिले आहे. या घटनेनंतर आम्ही आमच्या प्रणालीत सुधारणा केली आहे. सर्व वैमानिकांना या घटनेनंतर प्रशिक्षणही देण्यात आल्याचे एअर एशियाने सांगितले आहे.