वातावरणाच्या दाबामध्ये झालेल्या वेगवान बदलामुळे जावा समुद्राच्या पाण्याला स्पर्श होऊन एअर एशियाच्या विमानाचा स्फोट होऊन ‘तो’ दुर्दैवी अपघात घडला, असे विमानातील ब्लॅक बॉक्सच्या एका भागाच्या तपासणीनंतर स्पष्ट झाल्यानंतर या अपघाताचे गूढ उलगडले.
२८ डिसेंबरला इंडोनेशियाहून सिंगापूरला निघालेल्या ए ३२०-२०० जेट विमानाचा अपघात होऊन १६२ जण मरण पावले होते. उड्डाणासंबंधीची महत्त्वाची बातमी असलेला ‘ब्लॅक बॉक्स’ या विमानाच्या अवशेषांचा शोध घेणाऱ्या नौदलाच्या पाणबुडय़ांना काल सापडला होता. त्यापैकी ‘फ्लाइट डाटा रेकॉर्डर’ची तपासणी करण्यात आली. ब्लॅक बॉक्समधील दोन रेकॉर्डरपैकी ‘कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर’ही सापडला असला, तरी त्याचे अद्याप विश्लेषण करण्यात आलेले नाही.
शोध आणि बचाव पथकाचे समन्वयक एस. बी. सुप्रियार्दी यांनी या अपघाताचे नाटय़मय तपशील पत्रकारांना सांगितले.