मलेशियाच्या बेपत्ता विमानाला याच महिन्यात  एक वर्ष पूर्ण झाले असतानाच  फ्रान्सच्या आल्प्स पर्वतराजीत जर्मनीचे विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात १५० प्रवासी मरण पावल्याची भीती आहे. फ्रेंच आल्प्स पर्वतराजीत एका रिसॉर्टजवळ हे विमान कोसळले.  एअरबस ए ३२० विमानात एकूण १४८ प्रवासी होते. विमान पर्वतराजीत कोसळल्याने साध्या वाहनांना तेथे मदत कार्य करणे अवघड आहे असे सांगण्यात आले. पोलिसांच्या दोन हेलिकॉप्टर्सना विमानाचे अवशेष पर्वतराजीत दिसले आहेत. लुफ्तान्सा कंपनीसाठी मंगळवार काळा दिवस ठरला असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्स्टन स्पोर यांनी म्हटले आहे.
या विमान अपघातात कुणी वाचल्याची शक्यता वाटत नाही, असे या दुर्घटनेनंतर फ्रान्सच्या अध्यक्षांनी वार्ताहरांना सांगितले. हे विमान स्पेनच्या किनारी भागातील बार्सेलोना शहरातून जर्मनीतील डय़ुसेलडॉर्फ शहराकडे जात असताना आग्नेय फ्रान्समध्ये बार्सेलोनेट भागात कोसळले. विमान संकटात असल्याचे संदेश सकाळी १०.४७ वाजता मिळाले होते असे सूत्रांनी सांगितले. विमानात १४२ प्रवासी व सहा कर्मचारी होते. हे विमान लुफ्तान्सा जर्मन एअरलाईन्सच्या जर्मनविंग्ज संलग्न कंपनीचे होते. ए ३२० विमानात साधारण १५० ते १८० प्रवासी क्षमता असते.
* विमानाचे अवशेष डिग्नेलेस बेन्स येथे ६५०० फूट उंचीवर सापडले.
* अपघातात कुणीही वाचले नसल्याचा वाहतूक मंत्र्यांचा अंदाज.
* मृतांमध्ये जर्मन, स्पॅनिश, तुर्कीश प्रवासी.
* लुफ्तान्सा व एअरबसचे शेअर्स कोसळले.

अलीकडे झालेले मोठे विमान अपघात
४ फेब्रुवारी २०१५ : ट्रान्स एशियाचे विमान तैपेईजवळ कोसळून ५३ प्रवासी व चार कर्मचारी ठार.

२८ डिसेंबर २०१४ : एअर आशियाचे विमान जावा समुद्रात कोसळले. ७ कर्मचाऱ्यांसह १५५ प्रवासी मृत्युमुखी.

१० ऑगस्ट २०१४ : सेपाहान एअरलाइन्स कंपनीचे तेहरान येथून तबास येथे जाणारे विमान उड्डाण झाल्यानंतर लगेचच कोसळून ४८ जण ठार.

२४ जुलै २०१४ : एअर अल्जिरी कंपनीच्या विमानास खराब हवामानामुळे अपघात. ११० प्रवासी व सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू.

२३ जुलै २०१४ : ट्रान्स आशिया एअरवेज कंपनीचे विमान मुसळधार पावसामुळे कोसळले. ४४ प्रवासी व चार कर्मचारी जागीच ठार.

१७ जुलै २०१४ : मलेशिया एअरलाइन्सचे विमान युक्रेनमध्ये कोसळून २८३ प्रवासी व १५ कर्मचारी मृत्युमुखी.

८ मार्च २०१४ : मलेशिया एअरलाइन्सचे एमएच-३७० हे विमान हिंदी महासागरात कोसळून २२७ प्रवासी व १२ कर्मचारी अद्याप बेपत्ता.

१६ फेब्रुवारी २०१४ : नेपाळ एअरलाइन्सचे विमान पोखराजवळ कोसळले. १५ प्रवासी व तीन कर्मचारी ठार.