एअरसेल-मॅक्सिस गैरव्यवहारप्रकरणी माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारन, त्यांचे बंधू कलानिधी मारन यांच्यासह सर्व आरोपींना पतियाळा हाऊस न्यायालयाने गुरुवारी दिलासा दिला आहे. सर्व आरोपींविरोधात कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याने त्यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

चेन्नईचे दूरसंचार प्रवर्तक सी. शिवशंकर यांच्यावर २००६ मध्ये एअरसेल आणि त्याच्या उपकंपन्यांमध्ये आपली भागिदारी मलेशियन कंपनी मॅक्सिस ग्रुपला विकण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांच्यावर होता. हा आरोप मारन यांनी फेटाळून लावला होता. या प्रकरणी पतियाळा हाऊस न्यायालयाने आज, गुरुवारी निकाल दिला. मारन बधूंसह सर्वांवर आरोप निश्चिती आणि त्यांच्या जामीन अर्जांवर सुनावणीसह २४ जानेवारीला निकाल देण्यात येणार होता. मात्र, न्यायालयाने त्यावेळी सुनावणी टळली होती. न्यायालयाने सर्व आरोपींविरोधात कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे सांगून या सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर दयानिधी मारन यांनी आनंद व्यक्त केला आहे.

या प्रकरणात सीबीआयने मारन बंधू, राल्फ मार्शल, टी. आनंद कृष्णन, मेसर्स सन डायरेक्ट टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड, ब्रिटनची कंपनी एस्ट्रो ऑल एशिया नेटवर्क, मलेशियाची मॅक्सिस कम्युनिकेशन्स आणि साऊथ एशिया एंटरटेन्मेंट होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. या सर्वांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉण्ड्रिंगप्रकरणी मारन बंधू, कलानिधींच्या पत्नी कावेरी, साऊथ एशिया एफएफ लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक के. शनमुगम, एसएएफएल आणि सन डायरेक्ट टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला होता.