एअरसेल- मॅक्सिस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे अडचणीत आलेले कार्ती चिदंबरम यांच्या वकिलांना सुप्रीम कोर्टाने गुरुवारी झापले. कार्ती चिदंबरम यांना परदेशवारीला परवानगी देण्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी वकिलांनी केली होती. यावर ‘कार्ती चिदंबरम यांची परदेशवारी इतकीही महत्त्वाची नाही की त्यावर उद्याच सुनावणी घ्यावी’, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले.

एअरसेल- मॅक्सिस आर्थिक गैरव्यवहारातील आरोपी कार्ती चिदंबरम यांच्यावतीने परदेशवारीला परवानगी देण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. यावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी वकिलांनी केली. यावर सुप्रीम कोर्टाने सांगितले कार्ती चिदंबरम यांची परदेशवारीही इतकीही महत्त्वाची नाही. तुम्ही जितक्या केसेस हाताळता त्यापेक्षा जास्त खटल्यांवर आम्ही सुनावणी घेतो, असे कोर्टाने सांगितले.

दरम्यान, या प्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीत सक्तवसुली संचालनालयाने न्यायालयात भूमिका मांडली होती. माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेस नेते पी. चिदम्बरम हे सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांनुसार ठराविक मुदतीत तपास पूर्ण करणे कठीण झाले आहे. सत्य शोधून काढण्यासाठी त्यांची कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे, असे ईडीने न्यायालयात सांगितले होते.

गुरुवारी झालेल्या सुनावणीत चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन पटियाला हाऊस न्यायालयाने २६ नोव्हेंबरपर्यंत वाढवला आहे. तसंच, त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांचाही अटकपूर्व जामिन २६ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.