केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एअरसेल मॅक्सिस प्रकरणात पटियाला हाऊस कोर्टात नवे आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये १८ आरोपींची नावे असून त्यात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या नावाचाही समावेश आहे.

आरोपपत्रामध्ये चिदंबरम पितापुत्रांसह काही सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. यापैकी काही अधिकारी सेवेत आहेत तर काही निवृत्त झाले आहेत. चिदंबरम यांचे नाव आरोपी म्हणून आल्याने त्यांना तसेच काँग्रेसला हा चांगलाच धक्का असल्याचे मानण्यात येत आहे कारण हा घोटाळा झाला तेव्हा चिदंबरम हे अर्थमंत्री होते.
विदेशी गुंतवणुकीला चालना देण्यासंदर्भातल्या घटनेमध्ये दोन प्रकारचे पैशाचे व्यवहार झाल्याचे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात दिल्ली कोर्टाने पी चिदंबरम व कार्ती या दोघांना 7 ऑगस्ट पर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. चिदंबरम अर्थमंत्री असताना आर्थिक अफरातफर झाली आणि कार्ती व चिदंबरम यांचा यात सहभाग होता अशा स्वरूपाचा आरोप आहे. विदेशी गुंतवणुकीसाठी फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाने ग्लोबल कम्युनिकेशन या कंपनीला एअरसेलमध्ये गुंतवणूक करण्यास अनुमती दिली होती. यावेळी आर्थिक अफरातफर झाल्याचा आरोप आहे. कार्तीवर याआधी ठपका ठेवण्यात आला होताच, मात्र आता माजी अर्थमंत्री असलेल्या पी. चिदंबरम यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात सीबीआयने उभे केले आहे.