काश्मीर खोऱ्यात लष्कराच्या हालचाली वाढल्यानंतर तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली असुनअमरनाथ यात्रेकरूंना माघारी जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. यात्रेकरू आणि पर्यटक घराकडे परतण्यास सुरूवात होताच विमानाचे दर आभाळाला भिडले आहेत. त्यामुळे यात्रेकरूंना याचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

श्रीनगरहून शनिवारी आणि रविवारी उड्डाण करणाऱ्या विमानांचे जवळपास सर्व सीट आरक्षित झाले आहेत. त्यामुळे उर्वरित शिल्लक असलेल्या तिकिटांसाठी प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. श्रीनगर-दिल्ली प्रवासाचे रविवारचे तिकिट सुरुवातीला १५ हजार ५०० होते. ते थेट २१ हजारांवर पोहोचले आहे. त्याचबरोबर श्रीनगर-मुंबई तिकिट १६ हजार ते २५ हजारांच्या दरम्यान आहे. नागरी उड्डाण महासंचालक श्रीनगरमधील हवाई वाहतूक परिस्थितीवर नजर ठेवून असुन श्रीनगर विमानतळावरील उच्च अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून आहे.

आम्ही हवाई वाहतूक कंपन्या आणि श्रीनगर विमानतळांशी संपर्क ठेवून आहोत. गरज पडल्यास जास्तीची विमाने सोडण्यात येईल. तशी तयारीही करण्यात आली आहे. शनिवारी आणि रविवारचे जवळपास सर्व तिकिटे आरक्षित झाल्याने शिल्लक राहिलेल्या तिकिटांचे दर वाढले आहेत. सोमवारपासून विमान तिकिटांचे दर पुन्हा पूर्वपदावर येतील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.