इराणची राजधानी तेहरान येथून उड्डाण केल्यानंतर एक  विमान कोसळून ३८ प्रवासी ठार झाले आहेत.  हे विमान पूर्वेकडील तबास शहराकडे जात होते असे इरना व इतर वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.
 स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.१८ वाजता हा अपघात झाला. या विमानाने मेहराबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर आझादी या मध्य तेहरानच्या पश्चिमेकडील भागात जाऊन कोसळले. लष्करातील जवानांचे कुटुंबीय राहात असलेला तो निवासी विभाग होता. या अपघातात सर्व विमान प्रवासी मरण पावले असल्याचे इराणच्या प्रवक्तयाने सांगितले.  
इराणचे  वाहतूक उपमंत्री अहमद माजिदी यांनी सांगितले की, अ‍ॅटोनोव एएन १४० टबरेप्रॉप प्रकारचे हे विमान सेपाहान एअरलाइन्सचे होते. त्यातील ४८ प्रवाशात सहा मुले व आठ कर्मचारी यांचा समावेश आहे. विमानाच्या मागच्या बाजूकडचा डॉल्फिन लोगो असलेला पंखा रस्त्यावरून लोंबकळताना दिसत होता त्यामुळे सुरक्षा दलांनी लगेच कडे केले. विमानाच्या ढिगाऱ्यातून काळा धूर बाहेर पडत होता. विमान भिंत व झाडांवर आदळून खाली कोसळले.
 एका व्यक्तीने सांगितले की, हे विमान ५०० मीटर अंतरावर कोसळले अन्यथा फार मोठी प्राणहानी झाली असती. आणखी एकाने सांगितले की, आपण मोटारबाईकवरून जात असताना मागच्या बाजूने मोठा आवाज झाला. देशातील मोठय़ा विमानतळावरून सुटलेले हे विमान होते. इराणच्या हवाई वाहतूक प्राधिकरणाचे प्रमुख अलिरेझा जहाँगिरियन यांनी सांगितले की, विमान झाडात जाऊन कोसळले त्यामुळे प्राणहानी कमी झाली. अँटोनोव्ह एन १४० हे लहान विमान प्रादेशिक वापरासाठीचे असून ते १५०० मैल अंतर जाऊ शकते व त्यात ५२ लोक बसू शकतात. इराणमध्ये गेल्या काही दिवसात विमान दुर्घटनांचे प्रमाण वाढले असून जुनी विमाने, त्यांच्या दुरुस्तीचा अभाव व नवीन सुटय़ा भागांची आंतरराष्ट्रीय र्निबधांमुळे कमतरता यामुळे हे अपघात होत आहेत.