एअरो एशिया २०१३च्या उद्घाटनप्रसंगी अजितसिंग यांनी, भारतातील प्रवासी वाहतूक आणि विमानतळ पायाभूत सुविधा यांमध्ये झालेल्या लक्षणीय वाढीबद्दल समाधान व्यक्त केले. देशात आणखी १५ विमानतळांना सरकारने मान्यता दिल्याचेही ते म्हणाले. गेल्या १० वर्षांत प्रवासी वाहतुकीचा वार्षिक वृद्धिदर जवळपास १५ टक्के इतका राहिला आहे. पुढील १० वर्षांत देशांतर्गत प्रवासी वाहतूक वार्षिक १८० दशलक्ष प्रवासी इतकी होणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय वाहतूक ८० दशलक्ष इतकी होण्याची अपेक्षा आहे, असेही नागरी उड्डाणमंत्री म्हणाले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने अत्याधुनिक आणि देशी बनावटीच्या नव्या टर्मिनल इमारती कोलकाता आणि चेन्नईमध्ये बांधल्या आहेत त्याचा उल्लेख करून अजितसिंग यांनी, सरकारने हरितपट्टा धोरणाखाली आणखी १५ विमानतळे बांधण्याचे ठरविले असून त्यापैकी बहुसंख्य विमानतळे खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील सहभागाने बांधण्यात येणार आहेत, असे सांगितले. भारतीय विमानतळांवरील प्रवासी क्षमतेमध्ये गेल्या पाच वर्षांत तिपटीने वाढ झाली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण देशातील ३५ बिगरमेट्रो विमानतळांचे आधुनिकीकरण करणार आहे, असेही ते म्हणाले.