27 November 2020

News Flash

एअरटेल विरुद्ध जिओचा वाद चव्हाट्यावर, स्पर्धा आयोगात एकमेकांविरोधात तक्रार

बाजारातील स्पर्धेचे वातावरण नष्ट केल्याचा आरोप एअरटेलने जिओविरोधात केला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मोफत सेवा देऊन जिओने बाजारातील स्पर्धाच नष्ट करुन टाकली अशा आशयाची तक्रार भारती एअरटेलने भारत सरकारच्या स्पर्धा आयोगाकडे तक्रार दाखल केल्याचे वृत्त फायनांशियल एक्सप्रेसने दिले आहे. या तक्रारीमुळे रिलायन्स जिओ विरुद्ध इतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये सध्या सुरू असलेला संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. याआधी जिओने देखील स्पर्धा आयोगाकडे व्होडाफोन, आयडिया आणि एअरटेलविरोधात तक्रार दाखल केली होती. व्होडाफोन, आयडिया आणि भारती एअरटेल या कंपन्या जिओला इंटरकनेक्शन नाकारत आहेत, जिओच्या कॉलला खराब व्हॉइस क्वालिटी दिली जात आहे, अशी तक्रार जिओने स्पर्धा आयोगाकडे दोन महिन्यांपूर्वी केली होती.

बाजारात असलेले आपले वजन वापरुन व्होडाफोन, आयडिया आणि एअरटेल या कंपन्या जिओच्या कनेक्शनला मुद्दामहून खराब सेवा पुरवत आहेत. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असे या तक्रारीमध्ये म्हटले होते. या कंपन्यांनी एखाद्या टोळीप्रमाणे कार्य करत असून जिओला व्यवसाय करू देत नसल्याचे तक्रारीमध्ये म्हटले होते. जिओच्या तक्रारीच्या प्रत्युत्तरात एअरटेलनेही तक्रार दाखल करुन रिलायन्सने मोफत सेवा देऊन बाजाराची रचना मोडल्याचा आरोप केला आहे.

रिलायन्सने नोव्हेंबर महिन्यात या कंपन्यांविरोधात तक्रार दाखल केली होती तर एअरटेलने २ फेब्रुवारीला तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची आदेश स्पर्धा आयोगाने दिले आहेत. बाजारातील स्पर्धेचे वातावरण नष्ट केल्याचा आरोप दोन्ही जिओ आणि इतर टेलिकॉम कंपन्या एकमेकांवर करत आहेत. जिओने नियमांचा भंग केल्या प्रकरणी टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय) यांच्याकडे एअरटेल आणि आयडियाने तक्रार दाखल केली होती. याबाबत ट्रायने बघ्याची भूमिका घेतली असल्यामुळे टेलिकॉम कंपन्या नाराज आहेत असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या तक्रारीवर आज सुनावणी होणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून जिओने भारतामध्ये आपले जाळे निर्माण केले. आपल्या जवळ असलेल्या पायाभूत सुविधांच्या जोरावर रिलायन्सने विस्तार आणि आपल्या सेवेच वितरण केले असे एअरटेलने स्पर्धा आयोगाला केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. भारतात किंवा जगात कुठेही एकही कंपनी अशी नाही की अमर्यादित व्हॉइस कॉल किंवा डेटा सर्व्हिस पूर्णपणे मोफत देईल. तेव्हा स्पर्धेचे नियम जिओने मोडले आहेत, असा आरोप एअरटेलने केला आहे. रिलायन्सजवळ असलेल्या पायाभूत सुविधांसोबतच जिओसाठी २०१० पासून २ अब्ज डॉलर गुंतवण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2017 9:25 am

Web Title: airtel jio reliance vodafone idea competitive commission of india
Next Stories
1 ट्रम्पविरोधात लंडनसह युरोपमध्ये निदर्शने
2 स्वातंत्र्यदेवीच्या पुतळय़ाचे डोके उडवल्याचे चित्र प्रसिद्ध
3 १८ लाख लोकांना पैशाच्या स्रोताची विचारणा
Just Now!
X