टेलिकॉम जगतात रिलायन्स जिओने प्रवेश केल्यापासून दिग्गज कंपन्यांचे धाबे दणाणल्याचे दिसते. जिओला आव्हान देण्यासाठी त्यांनी दिलेल्या स्कीमप्रमाणे किंवा त्यापेक्षाही कमी दरात डेटा व कॉलिंगचे विविध प्लॅन्स सादर करण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. आता या युद्धात एअरटेलनेही उडी घेतली असून त्यांनी आपल्या 4जी ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर सादर केली आहे. कंपनीने प्रीपेड ग्राहकांसाठी ३९९ रूपयांचा एक नवा प्लॅन आणला आहे. यामध्ये ८४ दिवसांत ८४ जीबी डेटाबरोबर मोफत कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. रिलायन्स जिओच्या ३९९ रूपयांच्या प्लॅनसारखाच हा एअरटेलची ही योजना आहे.

एअरटेल वेबसाइटनुसार ही ऑफर केवळ 4जी फोन आणि 4जी सिम असलेल्या ग्राहकांसाठीच आहे. त्याचबरोबर कंपनी २४४ रूपयांत ७० दिवसांपर्यंत दररोज १ जीबी डेटा देत आहे. त्याचबरोबर या अंतर्गत मोफत कॉलिंगचीही सुविधा आहे.

दरम्यान, रिलायन्स जिओने स्वस्त ऑफर देऊन टेलिकॉम कंपन्यांमध्ये ‘प्राइस वॉर’ सुरू केले आहे. या स्वस्त ऑफर्स मुळे टेलिकॉम कंपन्यांच्या महसूल आणि नफ्यावर परिणाम झाला आहे.

त्याचबरोबर नुकताच देशातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून ओळखली जाणाऱ्या व्होडाफोनतर्फे ग्राहकांना 4जीचा ७० जीबीचा डेटा प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन केवळ २४४ रुपयांना असून ७० दिवस दररोज १ जीबी इतका डेटा ग्राहक वापरु शकणार आहेत. हायस्पिड डेटाबरोबरच अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधा देण्यात आली आहे. मात्र व्होडाफोनच्या नवीन ग्राहकांनाच हा लाभ घेता येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. दुसरीकडे रिलायन्स जिओतर्फे ३०९ रुपयांच्या प्लॅनमध्ये केवळ ५६ दिवसांत रोज १ जीबी इतका डेटा 4जी स्पीडने वापरता येणार आहे. याशिवाय जिओने अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा दिली आहे. याशिवाय जिओने ८४ दिवस व्हॅलिडिटी असलेला ३९९ चा प्लॅनही दिला आहे.