जिओच्या धन धना धन ऑफरसमोर आता एअरटेलकडून आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. टेलिकॉम ब्लॉगर असलेल्या संजय बाफना यांनी केलेल्या ट्विटनुसार एअरटेलकडून लवकरच ३९९ रुपयांच्या नव्या ऑफरची घोषणा केली जाऊ शकते. या ऑफर अंतर्गत दररोज १ जीबी ४जी डेटा दिला जाणार आहे. यासोबतच या ऑफर अंतर्गत ७० दिवस अमर्यादित कॉल करता येणार आहेत. इंडिया टुडेने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

एअरटेलच्या ४ जी ग्राहकांनाच नव्या ऑफरचा लाभ घेता येईल. जिओच्या धन धना धनला टक्कर देण्यासाठी एअरटेलकडून आणखी दोन प्रिपेड ऑफरची घोषणा केली जाऊ शकते. या ऑफर अंतर्गत एअरटेलच्या ग्राहकांसाठी दोन नव्या ऑफर्सची घोषणा करण्यात येईल. यातील एका ऑफर अंतर्गत ग्राहकांना दररोज १ जीबी ४ जी डेटा मिळेल. तर दुसऱ्या ऑफर अंतर्गत ग्राहकांना दररोज २ जीबी ४ जी डेटा मिळेल. या दोन नव्या ऑफर विविध किमतींना उपलब्ध असतील. एअरटेलने अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र टेलिकॉम ब्लॉगर असलेल्या संजय बाफना यांनी या संदर्भातील ट्विट केले आहे. भारतीय टेलिकॉम क्षेत्रातील एक प्रतिष्ठीत नाव असल्याने बाफना यांचे ट्विट लवकरच खरे ठरण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी सप्टेंबरमध्ये जिओने भारतीय टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केला. जिओने सुरुवातीला डेटासह सर्वच सुविधा मोफत दिल्या होत्या. जिओला टक्कर देण्यासाठी आणि ग्राहक वर्ग टिकवून ठेवण्यासाठी एअरटेलनेदेखील इंटरनेट ऑफर्स आणत जिओला कडवी लढत दिली आहे. आता जिओने धन धना धन ऑफर आणत ग्राहकांना दिवसाकाठी १ जीबी ४ जी आणि २ जीबी ४ जी डेटा वापरण्याची संधी दिली आहे. समर सरप्राईज ऑफरला ट्रायने दणका दिल्यानंतर आता जिओने धन धना धन ऑफर आणत पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्यांना धक्का दिला आहे. जिओच्या ऑफरला एअरटेलकडून लवकरच प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता आहे.