काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी शनिवारी रात्री अनपेक्षितरीत्या आपल्या पक्षातील हायकमांड संस्कृतीवर हल्ला चढवून, राष्ट्रीय पक्षांमध्ये पक्षांतर्गत लोकशाही असावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
‘ही हायकमांड संस्कृती संपवायला हवी’, असे अलीकडेच दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारलेले आणि राहुल गांधी यांच्या निकटचे मानले जाणारे माकन एका वार्षिक वादस्पर्धेत बोलताना म्हणाले. काँग्रेससह सर्व राष्ट्रीय पक्षांमध्ये जोपर्यंत आपण सत्तेचे विकेंद्रीकरण करत नाही, तोपर्यंत आपल्याला उज्ज्वल भवितव्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
‘राजकारण हे राज्यांचे आहे, देशाचे नव्हे,’ हा वादस्पर्धेचा विषय होता. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, बिहारचे माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी, भाजपचे पश्चिम बंगालचे प्रभारी सिद्धार्थ नाथ सिंग आणि काँग्रेसचे खासदार संजय निरुपम हेही स्पर्धेत सहभागी झाले होते.
राष्ट्रीय पक्षांना आपले अस्तित्व टिकवायचे असेल, तर त्यांना सत्तासंरचनेचे संपूर्ण विकेंद्रीकरण करावे लागेल, तसेच हायकमांड संस्कृती सोडून द्यावी लागेल, पक्षाच्या कार्यकर्त्यांना अधिक अधिकार द्यावे लागतील, तरच राष्ट्रीय पक्ष टिकू शकतील. राष्ट्रीय पक्षांमध्ये पक्षांतर्गत लोकशाही नसेल, तर एकतर हे पक्ष अस्तित्व गमावून बसतील किंवा त्यांचे महत्त्व संपेल, असे मत माकन यांनी व्यक्त केले. महत्त्वाचे निर्णय घेताना कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करायला हवा, असेही माकन म्हणाले.