भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल चीनमध्ये पोहचले आहेत, ब्रिक्सचे सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक गुरूवारपासून सुरू झाली आहे या बैठकीत सहभाग घेण्यासाठी डोवाल हे चीनमध्ये पोहचले आहेत. सिक्कीममधल्या डोक्लाम प्रश्नी ते आपली भूमिका मांडणार आहेत. आज त्यांनी चीनचे सुरक्षा सल्लागार यांग जिची यांची भेट घेतली आहे, तसंच या प्रश्नी ते चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन या दोन्ही देशांमधले संबंध डोक्लाम प्रश्नामुळेच तणावाचे झाले आहेत. डोक्लाम प्रश्नी चीननं आडमुठी भूमिका घेतली आहे. चीन आपलं सैन्य मागे घ्यायला तयार नाही त्यामुळेच भारतानंही सैन्य हटवलेलं नाही, अशात आता आमच्यापुढे युद्धाशिवाय काहीही पर्याय नाही असंही चीननं म्हटलं आहे. सगळ्या ब्रिक्स देशांनी दहशतवाविरोधात एकत्र येत त्याचा सामना केला पाहिजे असं मत अजित डोवाल यांनी व्यक्त केलं आहे. शी जिनपिंग यांची भेट घेण्याआधी डोवाल यांनी चीनचा जम्मू आणि काश्मीरमधला हस्तक्षेप यावरही चर्चा केली. त्यांचा हा दौरा यशस्वी ठरेल आणि भारत चीन प्रश्नावर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.

मात्र चीनचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सनं मात्र डोवाल यांच्या दौऱ्यामुळे काहीही साध्य होणार नाही असं म्हटलं आहे. आधी भारतानं डोक्लाममधून सैन्य मागे घ्यावं त्याशिवाय कोणतीही चर्चा होऊ शकणार नाही. तसंच भारत हा चीन आणि भूतान या दोन देशांमध्ये तिसऱ्या पक्षाची भूमिका बजावत आहे ते बंद झालं पाहिजे असाही इशारा चीननं दिला आहे. असं घडलं तरच आम्ही काश्मीर प्रश्नी बोलणं सोडून देऊ असंही या ग्लोबल टाईम्सनं म्हटलं आहे. आता अजित डोवाल भारतात परतल्यावरच त्यांच्या चीन दौऱ्याचा काय फायदा झाला ते स्पष्ट होऊ शकणार आहे.