भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी अजित डोवाल यांना कायम ठेवण्यात आले असून त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. डोवाल यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. राष्ट्रीय सुरक्षेमध्ये डोवाल यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.

भारताच्या बाह्य सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या ‘रॉ’ मध्ये महत्वाच्या पदांवर काम करण्याचा अजित डोवाल यांना अनुभव आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेवर आले. तेव्हापासून अजित डोवाल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. पंतप्रधान मोदींचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे.

पाकिस्तानबाबत भारताने जे कठोर धोरण स्वीकारले आहे. त्यामागे डोवाल असल्याची नेहमीच चर्चा असते. अजित डोवाल ‘रॉ’ मध्ये कार्यरत असताना अनेक वर्ष ते पाकिस्तानात होते. त्यामुळे पाकिस्तान संदर्भात रणनिती आखण्यात त्यांची महत्वाची भूमिका असते. २०१६ साली उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केला होता तसेच पुलवामा हल्ल्यानंतर इंडियन एअर फोर्सने केलेल्या एअर स्ट्राइकमध्येही त्यांची महत्वाची भूमिका होती.

आधीच मोदी सरकार पूर्ण बहुमत मिळवून सत्तेत आल्याने पाकिस्तानची डोकेदुखी वाढलेली असताना आता अजित डोवाल एनएसए पदावर कायम राहणार असल्याने निश्चितच पाकिस्तानची चिंता आणखी वाढणार आहे.