मध्य प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्रसिंग तोमर यांच्याविरोधात काँग्रेसचे नेते अजित जोगी यांनी न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला आहे. बस्तर येथे काँग्रेसच्या नेत्यांवर झालेल्या हल्ल्याच्या कटकारस्थानात जोगी यांचा हात होता अशी शेरेबाजी तोमर यांनी केल्यामुळे जोगी यांनी हा खटला दाखल केला आहे.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मनीष कुमार दुबे यांच्या न्यायालयात भारतीय दंडविधान कलम ५०० अंतर्गत हा खटला दाखल करण्यात आला असल्याची माहिती जोगी यांचे वकील एस.के.फरहान यांनी दिली. जोगी यांचे निवेदन सोमवारी घेण्यात आल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी १ जुलै रोजी मुक्रर करण्यात आली आहे.
२५ मे रोजी निघालेल्या काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर करण्यात आलेला हल्ला हा अजित जोगी यांच्याच कटाचा एक भाग होता, असे वक्तव्य तोमर यांनी केले असल्याची तक्रार जोगी यांच्या अर्जात करण्यात आली आहे. आपल्याविरोधात बदनामीयुक्त वक्तव्ये केल्याप्रकरणी तोमर यांनी माफी मागावी यासाठी जोगी यांनी त्यांना कायदेशीर नोटीसही बजावली होती परंतु तोमर यांच्याकडून त्यास समाधानकारक उत्तर न आल्यामुळे जोगी यांनी अखेरीस न्यायालयात धाव घेतली.