महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेळगावी संदर्भात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर केलेल्या विधानाचा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी निषेध केला असून  पवार यांच्या या  वव्याने या प्रश्नाची आग आणखी भडकेल असे म्हटले आहे.

वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले, की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. महाजन आयोगाचा अहवाल अंतिम आहे हे माहिती असताना त्यांनी हे विधान केले. बेळगावीतील मराठी लोक हे आमच्या राज्यासाठी कन्नडिगांसारखे आहेत. मराठी लोकांच्या विकासासाठी आम्ही येथे महामंडळ स्थापन केले आहे.

अजित पवार यांनी म्हटले आहे, की महाराष्ट्राची सर्वागीण वाढ झाली असून बेळगाव, कारवार, निपाणी हे कर्नाटकातील भाग महाराष्ट्रात आणावेत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. बाळासाहेबांचे हे स्वप्न साकार करण्याचा आम्ही प्रयत्न करू. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी हे वक्तव्य केले होते.

येडीयुरप्पा यांनी सांगितले, की बेळगावी विश्व कन्नड संमेलन २०११ मध्ये झाले होते, त्यात मराठी लोक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. मग अशी परिस्थिती असताना अजित पवार आणखी आग का लावत आहेत. हे निषेधार्ह असून आम्ही त्याचा निषेध करतो. त्यांनी अशी विधाने यापुढे करू नयेत.

महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात बेळगावीच्या ताब्यावरून सीमा वाद असून महाराष्ट्राने तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीत असलेल्या बेळगावी जिल्ह्य़ावर भाषिक तत्त्वावर दावा सांगितला आहे. कर्नाटक सरकारने बेळगावी हा त्यांच्या राज्याचा एकात्म भाग असल्याचे म्हटले असून तेथे सुवर्ण विधान सौधाची निर्मिती केली आहे. बेंगळूरुत जशी विधान सौधाची इमारत आहे तेथे विधानसभा अधिवेशन होते  तसे आता वर्षांतून एकदा विधानसभेचे अधिवेशन बेळगावीतही होते.