गोमांसबंदीवरुन देशभरात गदारोळ सुरु असतानाच अजमेर शरीफ दर्ग्याच्या धर्मगुरुंनी गोमांस खाणार नाही असा निर्धार केला आहे. गोमांसमुळेच हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण होत असल्याने भारतातील प्रत्येक मुस्लिमाने गोमांस खाणार नाही अशी शपथच घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्यातील मुख्य धर्मगुरु दिवान सईद जैनूल अबेदीन यांनी गोमांसबंदीचे समर्थन केले. ख्वाजा चिश्ती यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अबेदीन म्हणाले, ख्वाजा चिश्ती यांनी नेहमीच शांततेला प्राधान्य दिले होते. हिंदू आणि मुस्लिमांनी शांततेत एकत्र राहावे यासाठी त्यांचे प्रयत्न होते. याचे अनुकरण करत आता मुस्लिमांनी हिंदूच्या धार्मिक भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी आणि गोमांस सेवन करु नये असे आवाहन त्यांनी केले. मी आणि माझ्या कुटुंबानेही आता आयुष्यात पुन्हा कधीच गोमांस सेवन करणार नाही अशी शपथ घेतल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. हिंदू हे आपल्या बहीण- भावाप्रमाणे आहेत. आपण गोमांस खाल्याने त्यांच्या धार्मिक भावना दुखावतात. त्यामुळे आपण ते खाऊ नये. हे आपले मौलिक कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

गुजरात विधानसभेत गोहत्या बंदी कायद्यात सुधारणा करण्यात आली असून या गुन्ह्यात आता जन्मठेपेची शिक्षा होणार आहे. या सुधारित कायद्याचेही त्यांनी समर्थन केले. गुजरात विधानसभेने घेतलेला निर्णय योग्यच आहे असे त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर करावे अशी मागणीच त्यांनी केली.

दिवान अबेदिन यांनी त्रिवार तलाकलाही विरोध दर्शवला आहे. कुराण आणि शरीयामध्ये त्रिवार तलाकला मान्यता नाही असा दावा त्यांनी केला. आता आपल्या बहिणी आणि मुलींसाठी अन्यायकारक असलेल्या या पद्धतीला बंद केले पाहिजे असे भावनिक आवाहन त्यांनी केले. अजमेर शरीफ दर्गा हे मुस्लिमांसाठी देशातील सर्वात पवित्र धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.

सध्या देशभरात गोमांसबंदीवरुन वाद निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकारने अवैध कत्तलखान्यांवर कारवाई सुरू केली आहे. तर गुजरातमध्ये गोहत्या बंदी कायदा आणखी कठोर करण्यात  आला. तर दुसरीकडे ईशान्येतील राज्यात गोमांसबंदी करणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या या दुटप्पी भूमिकेवरही टीका होत आहे.