पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांच्या अजमेर शरीफ येथील दर्ग्याच्या भेटीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या दर्ग्याच्या प्रमुखांनी घेतलाय. काही दिवसांपूर्वी नियंत्रण रेषेवर दोन भारतीय सैनिकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यातील एका जवानाचे शिरही पळविण्यात आले. त्याचा निषेध म्हणून अश्रफ यांचे स्वागत न करण्याचा आणि त्यांच्या भेटीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रथेप्रमाणे कोणत्याही देशाचा प्रमुख अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याला भेट देतो. त्यावेळी दर्ग्याचे प्रमुख आणि चिश्ती यांचे वंशज तिथे उपस्थित राहतात. मात्र, नियंत्रण रेषेवर भारतीय सैनिकांचा शिरच्छेद करण्यात आला. ही घटना भारतीयांच्या जिव्हारी लागली. पाकिस्तान सरकार भारतीयांच्या भावना समजून घेऊ शकत नाही, म्हणूनच त्यांच्या भेटीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे दर्ग्याच्या प्रमुखांनी सांगितले. हा प्रकार म्हणजे केवळ मानवी हक्कांवर घाला नसून, इस्लामी कायद्याच्याही ते विरोधी आहे, असे ते म्हणाले.
अश्रफ शनिवारी दुपारी जयपूरमध्ये येत आहेत. परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांच्यासोबत भोजन घेतल्यानंतर अश्रफ ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याला सहकुटूंब भेट देतील.