संयुक्त राष्ट्रातील भारतीय वंशाच्या कर्मचारी आकांक्षा  अरोरा (वय ३४) यांनी सरचिटणीसपदासाठी उमेदवारी जाहीर केली असून सध्याचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस हेही पुन्हा पाच वर्षांसाठी या पदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

जानेवारी २०२२ पासून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या नवीन प्रमुखांचा कार्यकाल सुरू होणार आहे. अरोरा या संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम विभागातील लेखा समन्वयक आहेत.  त्यांनी ‘अरोरा फॉर एसजी’ या हॅशटॅगने प्रचार मोहीम सुरू केली आहे. माझ्यासारख्या पदावरील कुणी ही निवडणूक लढवण्याचे धाडस करणार नाही, पण मी ते करत आहे. रोज कामावर जायचे. मान खाली घालून काम करायचे व जग जसे आहे तसे स्वीकारायचे, या चाकोरीपलीकडे जाण्याचा विचार आहे, असे त्यांनी सांगितले. आकांक्षा यांनी चित्रफितीत म्हटले आहे, की ‘यापूर्वी जे लोक संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख होऊन गेले त्यांनी त्यांचे उत्तरदायित्व निभावले असे वाटत नाही.’

गेल्या ७५ वर्षांत संयुक्त राष्ट्रांनी कुठलीच आश्वासने पूर्ण केली नाहीत. निर्वासितांचे संरक्षण केले नाही. मानवतावादी मदतीचा हात पुढे केला नाही. तंत्रज्ञान व नवप्रवर्तनाला प्राधान्य दिले नाही. संयुक्त राष्ट्रांनी प्रगती घडवून आणायला हवी होती पण ते झाले नाही. त्यामुळे मी सरचिटणीस पदासाठी निवडणूक लढवित आहे. केवळ बघ्याची भूमिका घेण्यात अर्थ नाही. संयुक्त राष्ट्रे आतापर्यंत जी कामगिरी केली त्यापेक्षा चांगली कामगिरी करून दाखवू शकतात.’

गेल्या महिन्यात अँतोनियो गट्रेस (वय ७१) यांनी उमेदवारी जाहीर केली असून ते पुढील पाच वर्षे या पदासाठी इच्छुक आहेत. गट्रेस यांची मुदत या वर्षी ३१ डिसेंबरला संपत असून नवीन सरचिटणीस १ जानेवारी २०२२ रोजी पदभार स्वीकारतील. गट्रेस हे २०१७ पासून सरचिटणीस पदावर आहेत. नववे सरचिटणीस असलेले गट्रेस यांनी काही पातळीवर संवादाचा प्रयत्न केला.अजून हे पद महिलेला मिळालेले नाही. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणिसांची नियुक्ती आमसभा करीत असते व त्यासाठी सुरक्षा मंडळाची शिफारस लागते. पाच स्थायी सदस्यांपैकी कुणीही त्यात नकाराधिकार वापरू शकतो. गट्रेस यांचे प्रवक्ते स्टीफन द्युजारिक  यांनी आकांक्षा यांच्या उमेदवारीवर सांगितले, की गट्रेस हे स्वत उमेदवार आहेत त्यामुळे आम्ही यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. ही सदस्य देशांनी चालवलेली प्रक्रिया असते. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे अध्यक्ष व्होल्कन बोझकिर यांचे प्रवक्ते ब्रेन्डन वर्मा यांनी सांगितले, की आकांक्षा यांनी अध्यक्षांना त्यांच्या उमेदवारीविषयी लिहिले आहे. अध्यक्षांच्या कार्यालयाला त्यांचे पत्र मिळालेले नाही. सदस्य देशच उमेदवारी ठरवू शकतात. लोकांनी राजकीय नेत्यांची सेवा सोडून आता लोकांची सेवा सुरू करावी, असे उमेदवार आकांक्षा यांनी म्हटले आहे. नवीन संयुक्त राष्ट्रांच्या घडणीसाठी हीच योग्य वेळ आहे. कारण ही संस्था अनेक पेचप्रसंगातून जात आहे. शिक्षण, तंत्रज्ञान व इतर मार्गानी लोकांचे प्रश्न सोडवण्यात आणखी ७५ वर्षे घालवण्याची गरज नाही. त्यासाठी आताच बदल घडवावे लागतील. मी बदलणाऱ्या पिढीची प्रतिनिधी आहे, आम्ही केवळ बोलत नाही बदल करवून दाखवतो, असे त्यांनी सांगितले.

कोण आहेत आकांक्षा

आकांक्षा यांच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार त्या टोरांटोतील यॉर्क विद्यापीठातून पदवीधर झालेल्या असून त्यांनी प्रशासकीय अभ्यास विषयात पदवी घेतली आहे. त्यांनी सार्वजनिक प्रशासन विषयात कोलंबिया विद्यापीठातून स्नातकोत्तर पदवी घेतली आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्रात काम करताना आर्थिक पातळीवर काही सुधारणा केल्या आहेत. त्या भारतात जन्मलेल्या असल्या, तरी त्यांच्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे. त्यांनी कुणाही देशाकडे उमेदवारीसाठी पाठिंबा मागितलेला नाही. आपल्या उमेदवारीने निवड प्रक्रियेत बदल होईल, असा आशावाद त्यांनी पासब्लू संकेतस्थळावर व्यक्त केला आहे.