देशातील सर्वात नवीन राज्य असणाऱ्या तेलंगणामध्ये टीआरएस आणि एमआयएम युतीने बहुमताचा आकडा पार केला आहे. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा टीआरएस सत्तेत येणार आहे. तेलंगणामधील प्रचारादरम्यान ओवोसी बंधूंची भाषणे कायमच चर्चेत राहिली. या निवडणुकीमध्ये अकबरुद्दीन ओवोसी ही सलग पाचव्यांदा चंद्रयानगुट्टा मतदारसंघातून निवडून आले आहेत. विशेष म्हणजे हा विजय मिळवताना ओवोसी यांनी आपल्या विरोधात उभ्या असणाऱ्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्याइतके घवघवीत यश या निवडणुकीत मिळवले आहे. ओवोसी बगळता चंद्रयानगुट्टा मतदारसंघातील १४ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असून यामध्ये शिवसेनेच्या उमेदवार असणाऱ्या सुदर्शन मलकान यांना केवळ १९७ मते मिळाली आहेत.

तेलंगणामधील निवडणुकीदमरम्यान अकबरुद्दीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची भाषा केली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि ओवोसी बंधूंमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले होते. या वादामुळे एमआयएमचे वर्चस्व असणाऱ्या चंद्रयानगुट्टा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार अकबरुद्दीन यांना ९५ हजार ३११ मते मिळाली. तर त्याखालोखाल भाजपा उमेदवाराला १५ हजार ४८ मते मिळाली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या टीआरएसच्या उमेदवाराला येथे १४ हजार २२३ मते मिळाली आहेत. तर चौथ्या क्रमांकावर काँग्रेसचे उमेदवार उमेदवाराला ११ हजार ३०४ मते मिळाली आहेत. १९९९ पासून या मतदारसंघामध्ये एमआयएमने कायमच आपले वर्चस्व राखले आहे. म्हणूनच ओवेसींपुढे टीआरएस सारख्या बड्या पक्षाच्या उमेदवारासहीत काँग्रेस, भाजपा, शिवसेनेबरोबरच कोणत्याही अपक्ष उमेदवारांचा निभाव लागला नाही. विशेष म्हणजे या मतदारसंघामध्ये नोटा हा पर्याय पाचव्या स्थानी राहिला. नोटाला १००९ मते मिळाली.

विजयी उमेदावाराला मिळालेल्या मतांपेक्षा एक तृतियांश अधिक मते मिळाली तर विरोधी उमेदावाराची अनामत रक्कम परत मिळते. अन्यथा ही अनामत रक्कम जप्त होते. ही आकडेवारी दुपारी अडीच वाजेपर्यंतची आहे.