अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील भोंदू बाबांची दुसरी यादी जाहीर केली. भोंदू बाबांच्या यादीत दिल्लीचा विरेंद्र दीक्षित, बस्ती येथील सचिदानंद सरस्वती आणि अलाहाबाद येथील त्रिकाल भवंता यांच्या नावांचा समावेश आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांच्या अध्यक्षतेखाली अलाहाबादमध्ये देशातील १३ आखाड्यांच्या प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत या यादीतील नावांवर निर्णय घेण्यात आला. आम्ही जाहीर केलेल्या यादीतल्या भोंदू बाबांपासून सावध राहा असे आवाहन महंत नरेंद्र गिरी महाराजांनी केले. आम्ही जाहीर केलेली ही नावे अशी आहेत जी कोणत्याही संप्रदाय किंवा परंपरांमधून येत नाहीत असेही महंत नरेंद्र गिरी यांनी स्पष्ट केले.

स्वतःला महंत म्हणवून घेणारा विरेंद्र दीक्षित लैंगिक शोषणाच्या प्रकरणात अडकला आहे. तर स्वतःला देशातील कथित पहिल्या महिला आखाड्याची प्रमुख आणि स्वयंभू शंकराचार्य म्हणवून घेणारी त्रिकाल भवंतही या यादीत आहे. कुंभमेळ्या दरम्यान त्रिकाल भवंताने स्वयंभू शंकराचार्य असल्याचा दावा केला. तिच्या या दाव्यामुळे बराच वादही निर्माण झाला होता. याच त्रिकाल भवंता उर्फ अनिता शर्माचा समावेश भोंदू बाबांच्या यादीत करण्यात आला आहे.

अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील जनतेला हे आवाहन केले आहे की कोणत्याही भोंदू महंतावर मुळीच विश्वास ठेवू नका. या असल्या भोंदू बाबांमुळे साधू आणि संन्यासी यांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे. स्वतःला महंत म्हणवून घेणारे हे बाबा-बुवा प्रत्यक्षात भोंदू आहेत हेच आम्हाला या यादीद्वारे सांगायचे आहे म्हणूनच आम्ही ही दुसरी यादी प्रकाशित करतो आहोत. लोकांनी या सगळ्या भोंदूंपासून सावध राहावे यांच्या कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये असेही नरेंद्र गिरी यांनी म्हटले आहे.

अखिल भारतीय आखाडा परिषद ही सगळ्या आखाड्यांची प्रमुख संस्था आहे. या संस्थेची स्थापना आद्य शंकराचार्यांनी ८ व्या शतकात केली होती. याआधीही आखाडा परिषदेने देशातील भोंदू बाबांची यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये आसाराम बापू, त्यांचा मुलगा नारायण साई, निर्मलबाबा, राधे माँ, रामपाल, गुरुमीत राम रहिम यांच्यासहीत १४ नावांचा समावेश होता. आता दुसऱ्या यादीद्वारे देशातील इतर भोंदू बाबांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत.