शिवसेनेसोबत सुरु असलेल्या कंगना रणौतच्या वाकयुद्धानं आता राजकीय स्वरुप प्राप्त केलं असून कंगनाला भाजपाबरोबरच हिंदू साधूंची सर्वोच्च संस्था असलेल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेनं पाठिंबा दर्शवला आहे.

याप्रकरणी प्रतिक्रिया देताना आखाडा परिषदेनं कंगनाला ‘शूर आणि धाडसी राष्ट्रकन्या’ असं संबोधलं आहे. भीतीपोटी महाराष्ट्र शासनानं कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केल्याचं आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी म्हटलं आहे.

महंत गिरी म्हणाले, “बॉलिवूडमधील घराणेशाही आणि वर्चस्ववादावर कंगनाने निर्भिडपणे आवाज उठवला आहे. त्याचबरोबर तिने ड्रग माफियांचेही धाबे दणाणून सोडले आहे. सध्या ड्रग माफिया आणि महाराष्ट्र शासन दोघांनाही कंगनाची भीती वाटत असून त्यामुळेच त्यांनी तिला निशाणा बनवलं आहे. दरम्यान, देशातील सर्व साधूसंत आणि देशवासीय कंगनाच्या पाठीशी आहेत.” हिमाचल प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारने कंगनाला सुरक्षा पुरवल्याप्रकरणी महंत गिरी यांनी या दोघांचेही आभार मानले आहेत. बीएमसीनं कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईवर भाष्य करताना गिरी म्हणाले, “कंगनाचा आवाज दाबण्याचा केलेली ही कारवाई आहे.”

महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था ही खूपच वाईट बनल्याचंही महंत गिरी यांनी म्हटलं आहे. “पालघरमधील मॉब लिचिंगमध्ये दोन साधूंची हत्या झाली. यामध्ये महाराष्ट्र सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. आखाडा परिषद या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मात्र, राज्य सरकारने ते करण्यास अपयशी ठरलं आहे,” असंही ते म्हणाले.