लखनऊ : पुलवामा येथील दहशतवादी हल्लय़ात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान शहीद झाले असले तरी सरकार ‘थांबा आणि वाट पाहा’ धोरण ठेवून बघ्याची भूमिका घेत आहे, अशी घणाघाती टीका समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी नरेंद्र मोदी सरकारवर केली आहे.

तीन दिवसांचा शोक कालावधी पुढे वाढतच चालला आहे, असे सांगून ते म्हणाले, की रोज आपले जवान हुतात्मा झाल्याच्या बातम्या येत आहेत व भाजपचे राजकीय नेते हसत हसत त्यांच्या अंत्ययात्रांमध्ये सहभागी होत आहेत. जवान शहीद होत असताना सरकार थांबा व वाट पाहा दृष्टिकोन ठेवून बघ्याची भूमिका घेत आहे.

पुलवामात मेजरसह चार लष्करी जवान दहशतवाद्यांशी चकमकीत मारल्या गेल्याच्या सोमवारच्या घटनेनंतर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अखिलेश यांनी १५ फेब्रुवारीला केंद्रीय राखीव पोलिस दलाचे हुतात्मा जवान प्रदीप यांच्या कनौज येथील निवासस्थानी भेट दिली होती. पुलवामातील दहशतवादी हल्लय़ात प्रदीप यांचा मृत्यू झाला होता.  अखिलेश यांनी रविवारी ट्विटरवर भाजप सरकारला वंदे भारत एक्सप्रेसमधील तांत्रिक बिघाडाबाबत लक्ष्य केले आहे. या गाडीच्या उद्घाटनानंतर धूर दिसत होता. डब्यातील वीज गेलेली होती. ब्रेक निकामी झाले होते नंतर ती गाडी थांबत थांबत प्रवास करीत राहिली. शेतकरी संतप्त आहेत. युवकांना रोजगार नाही. देशाची सुरक्षा कोलमडली असून अर्थव्यवस्था ढासळली आहे, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले होते.दिल्ली ते वाराणसी दरम्यान नव्याने सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अनेक तांत्रिक बिघाड असूनही या गाडीच्या व्यावसायिक फेऱ्या रविवारपासून सुरू झाल्या आहेत.