अखिलेश यादव यांचा विश्वास; सप-बसपची संयुक्त सभा

उत्तर प्रदेशात विरोधकांची महाआघाडी ही चौकीदाराची सुट्टी करून देशाला लोकसभा निवडणुकीनंतर नवीन पंतप्रधान देईल, असा विश्वास समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी व्यक्त केला आहे. २०१४ मध्ये आम्ही चायवाल्यावर विश्वास ठेवला, कोटय़वधी रोजगारांचे आश्वासन त्या वेळी देण्यात आले. आता चौकीदारावर विश्वास ठेवा असे भाजप सांगत आहे, पण आम्ही नवा पंतप्रधान आणणार आहोत, असे त्यांनी समाजवादी पक्ष, बसप व राष्ट्रीय लोकदलाच्या संयुक्त प्रचारसभेत सांगितले. बसप प्रमुख मायावती व रालोदचे अजित सिंह या वेळी उपस्थित होते.

हे लोक स्वत:ला धर्माचे रक्षणकर्ते समजतात, पण त्यांना कुंभात डुबकी कशी घ्यायची ते माहिती नाही. काँग्रेस व भाजप या एकमेकांच्या प्रतिमाच आहेत. काँग्रेसला बदल घडवायचा नाही, ते सत्तेच्या मागे आहेत. भाजप विद्युतीकरणाचे दावे करीत आहे, पण आमच्याच पक्षांनी खेडय़ांचे विद्युतीकरण केले आहे, असे अखिलेश यांनी सांगितले.

मोदी नेहमी महाआघाडीला महामिलावट म्हणतात, त्याबाबत अखिलेश यांनी समाचार घेतला. आमची आघाडी ही नवीन पंतप्रधान आणण्यासाठीच झाली आहे. आपल्या सीमा सुरक्षित नाहीत. सरकारने देशाचा विश्वासघात केला. ही निवडणूक बदलासाठी आहे. मतभेद दूर करून मनोमीलनाचे पूल बांधण्यासाठी आहे.  सरकारने समाजात फूट पाडण्याची कारस्थाने केली आहेत. देवबंदमध्ये सामाजिक सलोखा आहे. एकीकडे माता शाकुंभरी देवीचे मंदिर आहे, तर दुसरीकडे दारूल उलुम आहे. भाजप मात्र सतत द्वेषाचे विष ओकत आहे. त्यांना जुन्या आश्वासनांबाबत विचारले तर ते चकार शब्द काढायला तयार नाहीत, असे अखिलेश यांनी सांगितले.