बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीसंदर्भात भाष्य करताना गुरूवारी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. नितीश कुमार यांना आपल्या माजी सहकाऱ्यांचा विरह सहन झाला हे सांगताना अखिलेश यांनी एका हिंदी गाण्यातील ओळी उद्धृत केल्या. ‘ना ना करते, प्यार तुम्हीं से कर बैठे करना था इंकार मगर इक़रार तुम्हीं से कर बैठे’, असे ट्विट त्यांनी केले.

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवरील भ्रष्टाचारांच्या आरोपांचे ओझे अखेर भिरकावून देताना संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी बुधवारी सायंकाळी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. नितीशकुमारांच्या या कृतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही मिनिटांमध्येच स्वागत केल्याने आणि नितीशकुमारांनी त्याबद्दल मनोमन आभार मानल्याने भाजप त्यांना पाठिंबा देणार असल्याचे स्पष्टच झाले. तशी घोषणा रात्री उशिरा बिहार भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी पाटण्यामध्ये केली. त्यानंतर आज सकाळी १० वाजता नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची तर भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, आता शुक्रवारी नितीश कुमार यांना बिहार विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. बिहार विधानसभेत एकूण २४३ जागा असून बहुमत सिद्ध करण्यासाठी १२२ जागांची गरज आहे. सध्या संयुक्त जनता दलाकडे ७१ आमदारांचे तर एनडीएकडे ५८ आमदारांचे संख्याबळ आहे. मात्र, नितीश यांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयावर जदयूचे अनेक नेते नाराज आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जदयूची मते फुटण्याची शक्यता आहे. लालू प्रसाद यादव यांनीदेखील काल जदयूचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. त्यामुळे उद्या बिहार विधानसभेत काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.