बसपाच्या नेत्या मायावती आणि सपा नेते अखिलेश यादव हे पहिल्यांदाच एका पोस्टरवर एकत्र दिसले आहेत. बसपाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या पोस्टरचा फोटो ट्विट करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  मायावती, अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि जदयूचे बंडखोर नेते शरद यादव या सगळ्यांचे फोटो या पोस्टरवर आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि एनडीएविरोधात सगळ्या विरोधकांनी एकत्र यावं असं आवाहन काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधकांच्या संयुक्त बैठकीत केलं होतं. बसपाच्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट करण्यात आलेलं हे पोस्टर याच एकजुटीसंदर्भातलं पहिलं पाऊल आहे असं म्हणता येईल.

२७ ऑगस्टला भाजप बिहारमधील पाटणा या ठिकाणी ‘भाजप हटाओ देश बचाओ’ ही विरोधकांची रॅली होणार आहे. या रॅलीमध्ये सगळे विरोधक एकत्र येणार आहेत. सपातर्फे अखिलेश यादवही या रॅलीत सहभागी होणार आहेत. मायावती या रॅलीत सहभागी होणार की नाही याबाबत अद्याप निश्चित माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. बसपाचे इतर नेते मात्र या रॅलीत सहभागी होणार आहेत.

१ सप्टेंबरला गुजरातमध्ये काँग्रेसतर्फे भाजप विरोधात रॅली काढली जाणार आहे, या रॅलीत मायावती सहभागी होणार आहेत. मात्र सध्या राजकीय वर्तुळात बसपाकडून ट्विट करण्यात आलेल्या या पोस्टरची चांगलीच चर्चा रंगली आहे. विरोधक या भाजप विरोधी यात्रेमध्ये नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.