यूपीचे मुख्‍यमंत्री अखिलेश यादव आज (रविवारी) दंगल पीडितांच्‍या भेटीसाठी मुझफ्फरपूरनगरला पोहोचले. यावेळी तेथील पीडितांनी त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली.
अखिलेश यादव सर्वप्रथम कवल या गावी पोहोचले. त्‍यांनी यावेळी सलीम या दंगल पीडिताची भेट घेतली. एका समुदायाने मुलीची छेड काढल्‍याबद्दल सलीम यांचा मुलगा शाहनवाझ याची २७ ऑगस्‍ट रोजी मलीकपुरा गावात हत्‍या केली होती. शाहनवाझच्‍या हत्‍येनंतर त्‍या समुदायातील लोकांनी हिंदू मुलाची हत्‍या केली. त्‍यानंतरच दंग्‍यास सुरूवात झाली होती. पीडितांची भेट घेत असताना अखिलेश यांना विरोधाचाही सामना करावा लागला. यावेळी लोकांनी अखिलेश यादव यांच्‍याविरोधात घोषणाबाजी केली आणि त्‍यांना काळे झेंडेही दाखवले. काही लोकांनी आझम खान यांच्‍या समर्थनात घोषणाबाजीही केली. वाढत्‍या विरोधामुळे यादव यांनी भेट आवरती घेत तेथून निघून जाणे योग्य समजले. अखिलेश यांनी मुझफ्फरनगरचे माजी एसएसपी सुभाष यादव यांना निलंबित केले आहे.
पंतप्रधान सोमवारी मुझफ्फरनगरचा दौरा करणार असून त्याच्या एक दिवस आधिच अखिलेश यांनी तेथे भेट दिली. पंतप्रधान झालेल्या दंगलीविषयी अखिलेस यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.