मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्यात सुरू झालेला वाद निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्यामध्ये मुलायम यांच्या निवासस्थानी आज सकाळी बैठक संपन्न झाली. गेल्या काही दिवसांपासून सत्तेच्या चाब्या कुणाकडे राहतील याचा वाद सुरू झाल्यापासून मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. आज या वादावर पडदा पडण्याची चिन्हे आहेत.

दोघांमध्ये नुकताच एक बैठक संपन्न झाली असून ते दोघे थोड्याच वेळात संयुक्त पत्रकार परिषद घेतील असा अंदाज वृत्तसंस्थांनी दिला आहे. यानंतर दोघे पिता-पुत्र निवडणुकीच्या कामाला एकत्ररित्या लागतील. मुलायम सिंह यादव यांनी कालच नमते घेत एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली होती. राज्याच्या हितासाठी समाजवादी पक्षाने एकत्र राहणे योग्य असल्याचे ते म्हणाले. आमच्या दोघांमध्ये कसलाही वाद नाही असे त्यांनी स्पष्ट केले होते. अखिलेश यादवच पुढील मुख्यमंत्री राहतील असे मुलायम यांनी म्हटले आहे. समाजवादी पक्षाचा अध्यक्ष मीच राहील असे देखील त्यांनी सांगितले.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकांसाठी तिकीट देण्याच्या वादावरुन दोन्ही पिता-पुत्रांमध्ये वादाला सुरूवात झाली. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष असून देखील आपल्याला विश्वासात घेतले नाही असे म्हणत मुलायम सिंह यादव यांनी अखिलेश यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले. त्याबरोबरच त्यांनी रामगोपाल यादव यांची देखील पक्षातून हकालपट्टी केली.

पक्षातील बहुतेक सर्वच आमदारांचा पाठिंबा अखिलेश यादव यांना आहे असे कळल्यानंतर मुलायम यांनी दोघांचे निलंबन रद्द केले. परंतु काही दिवसांतच पुन्हा रामगोपाल यादव यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. रामगोपाल यादव यांना ३० डिसेंबरला पक्षातून काढण्यात आले असल्यामुळे त्यांची राज्यसभेतील पक्षनेते म्हणून मान्यता रद्द करावी, अशी मागणी मुलायम यांनी सभापती हमीद अन्सारी यांच्याकडे केली. पक्षातून हकालपट्टी केल्यामुळे रामगोपाल यांची बसण्याची व्यवस्था मागच्या रांगेत करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

अखिलेश यादव यांचे निलंबन रद्द केल्यानंतर पक्षाचे चिन्ह ‘सायकल’ कुणाकडे राहील यावरुन वाद पेटला. त्यामुळे अखिलेश हे पक्षात असले तरी पिता-पुत्रांमध्ये सर्व काही ठीक नसल्याचे समजून येत होते. जर पक्षाचे चिन्ह सायकल आपल्याकडे राहिले नाही तर आपण मोटर सायकल हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवू अशी तयारी अखिलेश यांनी केली होती. जर पिता-पुत्रांमध्ये समेट घडला नाही तर १७ जानेवारीला सायकल हे चिन्ह सील केले जाऊ शकते.