उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना अलाहाबाद विद्यापीठात जाण्यापूर्वीच लखनौ विमानतळावर रोखण्यात आल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अखिलेश यादव हे प्रयागराजला जाण्यासाठी विमानतळावर आले होते. पण प्रशासनाने त्यांना जाण्याची परवानगी दिली नाही. या प्रकारामुळे विरोधी पक्षांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

अखिलेश यादव यांना प्रयागराजला जाण्यापासून विमानतळावरच रोखण्याचा हा निंदनीय प्रकार असल्याची टीका बसपा प्रमुख मायावती यांनी केली आहे. ही भाजपा सरकारची हुकूमशाही असून लोकशाहीच्या हत्येचे प्रतीक असल्याचा आरोप असल्याचे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, भाजपाचे केंद्र व राज्य सरकार बसपा आणि सपा आघाडीला इतके घाबरले आहेत की त्यांनी आमच्या राजकीय हालचाली व पक्षाच्या कार्यक्रमच रोखणे सुरू केले आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा लोकशाहीविरोधी कारवाईंचा योग्यरितीने सामना केला जाईल.

दरम्यान, दुसरीकडे भाजपाने अखिलेश यादव यांच्यावरच टीका केली आहे. शांततेने कुंभ मेळा सुरू आहे. विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांमध्ये सध्या चांगले वातावरण नाही. काही गडबड होऊ नये यासाठी त्यांना रोखण्यात आले. अखिलेश यादव यांचीही सुरक्षा ध्यानात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. हा मुद्दा ते राजकीय करत आहेत. त्यांना कुंभ मेळ्यात बाधा निर्माण करायची आहे, असे भाजपाच्या वतीने आरोप करण्यात आले आहेत.