समाजावादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव हे पहिल्यापासूनच लसीकरणाबाबतच्या त्यांच्या विधानांवरून चर्चेत राहिले आहेत. सुरूवातीला त्यांनी लसीकरणास विरोध दर्शवत लस घेण्यास नकार दर्शवला होता. “मी सध्या लसीकरण करून घेणार नाही. भाजपाच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू? जेव्हा आमचे सरकार तयार होईल तेव्हा प्रत्येकाला मोफत लस मिळेल. आम्ही भाजपाची लस घेऊ शकत नाही.” असं अखिलेश यादव यांनी म्हटलं होतं. यामुळे त्यांच्यावर टीका देखील केली गेली. यानंतर लसीकरणाबाबतच्या त्यांच्या भूमिकेत बदल होत गेल्याचेही दिसून आले आहे. आता पुन्हा एकदा अखिलेश यादव यांना लसीकरणाबाबत विधान केलं आहे.

भाजपाच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू? – अखिलेश यादव

“सर्वांनी लस घेतली पाहिजे, सातत्याने प्रयत्न केले पाहिजे की जास्तीत जास्त लसीकरण व्हावे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने रूग्णालयं सज्ज ठेवायला हवीत. उत्तर प्रदेशमधील जनतेला लस द्यावी व जेव्हा शेवटची लस उरेल तेव्हा मी तयार आहे, की मलाही दिली जावी. ” असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.

तर, या अगोदर समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांनी करोनाच्या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर, भाजपा नेत्यांकडून अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला होता.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी, मुलायम सिंह यादव यांना धन्यवाद देत, तुम्ही लस घेणं याचे प्रमाण आहे की, अखिलश यादव यांनी लसीबाबत अफवा पसरवली होती. यासाठी अखिलेश यादव यांनी माफी मागायला हवी. असं म्हटलं होतं.

मुलायम सिंह यादव यांनी लस घेताच उत्तरप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांनी अखिलेश यादव यांच्यावर साधला निशाणा, म्हणाले…

तसेच, उत्तर प्रदेश भाजपाचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी देखील अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनी मुलायम सिंह यादव यांचा लस घेतानाचा फोटो ट्विट करत, एक चांगला संदेश असं म्हटलं होतं. तसेच, अपेक्षा करतो की समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते व त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील आपल्या पक्षाच्या संस्थापकाकडून प्रेरणा घेतील. असं देखील ते म्हणाले होते.