News Flash

समाजवादी पक्षाची ‘स्मार्ट’ योजना, निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना स्मार्टफोनचे गाजर

येत्या आठवडाभरात या योजनेला कॅबिनेटची मंजुरी मिळू शकेल.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गतवेळी महाविद्यालयांतील विद्यार्थीनींना लॅपटॉपचे वाटप केले होते. (छाया-पीटीआय)

निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध आमिषे दाखवली जातात. यामध्ये तामिळनाडूने नेहमीच आघाडी घेतली आहे. काही वर्षांपूर्वी तामिळनाडूत मोफत टिव्ही, अल्प दरात तांदूळ यासारखे अनेक लोकानुनयी घोषणा केल्या होत्या. गत निवडणुकीत बिहारमध्ये नितीशकुमार यांनी मुलींना सायकलींचे वाटप केले होते. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षही याबाबतीत मागे नाही. मागील निवडणुकीत त्यांनी लॅपटॉप मोफत दिले तर आता ते स्मार्टफोन देण्याच्या तयारीत आहेत. निवडणुकीच्या या साठमारीत मात्र मतदारांचे चांगलेच फावणार आहे.
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एका टेलिकॉम कंपनीची 4 जी सेवा लाँच केली होती. या वेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आपल्या जाहीरनाम्यात मोफत स्मार्टफोन देण्याची योजना राबवणार असल्याचे म्हटले होते. निवडणुकीला आणखी एक वर्ष आहे, परंतु तत्पूर्वीच आपली ही योजना अंमलात आणण्याचे प्रयत्न अखिलेश यांच्याकडून सुरू आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार येत्या आठवडाभरात या योजनेला कॅबिनेटची मंजुरी मिळू शकेल. यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे.
समाजातील सर्वस्तरापर्यंत ही योजना पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक योजना पोहोचवण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना हवामानाचे अंदाज, बाजारमूल्य आणि विविध कर्जांची माहितीही दिली जाईल.
२०१२ च्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने बारावी पास विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्याचे जाहीर केले होते. यावर अखिलेश म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाचा ओघ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही लॅपटॉपचे वितरण केले होते. आता स्मार्टफोनची लोकप्रियता वाढली आहे. तरूण आणि शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्मार्टफोन एक चांगले माध्यम आहे. स्मार्टफोन नसेल तर मुलभूत सुविधा आणि सेवा क्षेत्रात गुंतवणूक करून काहीच फायदा नाही. त्यामुळेच आम्ही लॅपटॉप वाटले आणि आता स्मार्टफोन देण्यावर आमचा भर आहे.
१८ वर्षांचे बंधन
१८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांना यूपी सरकारच्या वतीने स्मार्टफोन देण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. सरकारने यासाठी स्मार्टफोन कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 11:43 am

Web Title: akhilesh yadav wants to give free smartphones to citizens
Next Stories
1 Teacher’s Day 2016 : शिक्षकदिनानिमित्त गुगलचे अनोखे डुडल
2 सय्यद सलाउद्दीनचा शेवटही बुरहान वानीसारखाच होईल; भाजपचा इशारा
3 विनोदी अभिनेता गुरप्रीत घुग्गीकडे पंजाबमध्ये ‘आप’ची जबाबदारी
Just Now!
X