पंजाबमधील पठाणकोटच्या हवाई तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्लानंतर अभिनेता अक्षय कुमार याने तीव्र संताप व्यक्त केला असून, दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना मारले पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्याने पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना दिली.
शनिवारी पहाटे पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना आतापर्यंत यश आले आहे. अजूनही हवाई तळाच्या परिसरात शोधमोहिम सुरू असून, दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशन सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर अक्षय कुमार म्हणाला, मी केवळ सिनेमातील हिरो आहे. त्यामुळे ‘गब्बर इज बॅक’, ‘बेबी’ असे सिनेमे प्रेक्षकांना दाखवून त्यांना जागे करण्याचे काम मी करू शकतो. अशा हल्ल्यांमध्ये जे सैनिक शहीद होतात, त्यांच्या कुटुंबीयांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तान दौरा आणि पठाणकोट हल्ला यांचा संबंध जोडणे चुकीचे असल्याचे त्यानी म्हटले आहे. या दोन्हीचा संबंध जोडला जावा, अशीच दहशतवाद्यांची इच्छा असते. त्यामुळे तसे केले गेले नाही पाहिजे, असे त्याने सांगितले.