मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या निवड व नियुक्ती घोटाळ्यात एमबीबीएसची विद्यार्थिनी नम्रता दामोर हिच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अन्वेषण शाखेने शुक्रवारी खुनाचा गुन्हा नोंदवला असून चौकशी सुरू केली आहे. त्याशिवायही दोन प्रकरणांत गुन्हे सीबीआयने दाखल केले आहेत. पत्रकार अक्षय सिंह यांच्यासह पाच जणांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणांची चौकशी सीबीआयने सुरू केली आहे. नम्रता दामोर ही २०१२ मध्ये उज्जन जिल्ह्य़ात रेल्वे मार्गावर मृतावस्थेत सापडली होती. ती इंदूरच्या एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती व मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळ्यातील लाभार्थी होती. तिने बेकायदेशीर मार्ग वापरून प्रवेश परीक्षा दिल्याचा आरोप आहे. तिचे जाबजबाब घेतल्यानंतर ती मृतावस्थेत सापडली होती. तिचा मृत्यूही संशयास्पद होता. दूरचित्रवाणी पत्रकार अक्षय सिंह यांनी तिच्या मृत्यूच्या चौकशीसाठी तिच्या आईवडिलांची मुलाखत घेतली होती पण त्यांचा अनपेक्षित मृत्यू झाला होता. पोलिसांनी दामोर हिच्या मृत्यूची चौकशी केली पण तिला रेल्वेखाली ढकलण्यात आले, की तिने आत्महत्या केली यावर काहीच त्यांना सांगता आले नव्हते. नम्रता दामोर हिच्या मृत्यूचे गूढ तीन वर्षांनीही कायम आहे. दरम्यान, या प्रकरणात तीन साक्षीदारांनी दिलेली माहिती गुप्त ठेवण्यात आल्याचे समजते. तीन डॉक्टरांनी तिचे शवविच्छेदन केले होते. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार तिचे नाकतोंड दाबून मारण्यात आले. व्यापम प्रकरणातील सर्व गुन्ह्य़ांचा तपास आता सीबीआयकडे देण्यात आला आहे.

किरार निलंबित
सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता मध्य प्रदेश मागासवर्ग आयोगाचे सदस्य व भाजप नेते गुलाब सिंह किरार यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार सिंह चौहान यांनी सांगितले,की किरार हे हा घोटाळा उघड झाल्यापासून बेपत्ता असून त्यांचे नाव विशेष चौकशी पथकानेही घेतले होते. गुलाब सिंह किरार व त्यांचे पुत्र शक्तिसिंह किरार यांच्यावर २०११ मधील परीक्षेबाबत आठ महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल केला असून
त्यांच्यासह आठ जणांवर आता सीबीआयने पुन्हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात संशयास्पद रीत्या मरण पावलेल्या पाच जणांच्या प्रकरणात सीबीआयने पुन्हा गुन्हे दाखल केले आहेत.

संसदेत प्रश्न मांडणार – ज्योतिरादित्य
व्यापम घोटाळ्याचा प्रश्न संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला जाईल कारण मध्य प्रदेश सरकारने याबाबत काहीही कृती केलेली नाही, असा आरोप काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला. या घोटाळ्यात अनेक साक्षीदार व आरोपी यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून त्याची चौकशी करण्यात मध्य प्रदेश सरकार कुचराई करीत आहे असे ते म्हणाले. अनेक वर्षे सरकारने घोटाळ्याच्या चौकशीत दिरंगाई केली. अनेक लोकांचा संशयास्पद मृत्यू झाला. ज्यांनी लाच दिली ते हजारो लोक तुरुंगात आहेत पण ज्या लोकांनी लाच घेतली ते अजून खुलेआम हिंडत आहेत. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या नेतृत्वाखाली सीबीआय चौकशी करीत आहे. त्यामुळे आम्ही आश्वस्त आहोत. व्यापम घोटाळ्यात पहिला गुन्हा इंदूर येथे राजेंद्रनगर पोलिस ठाण्यात ७ जुलै २०१३ रोजी दाखल झाला होता.