अल जझिरा या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला भारताचे चुकीचे नकाशे दाखवल्याबद्दल शिक्षा करण्यात आली असून त्यांचे प्रसारण भारतात पाच दिवस बंद करण्यात आले आहे.
अल जझिराने आज कोरा पडदा दाखवून त्यावर माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानुसार आमची सेवा २२ एप्रिल रात्री १२ वाजून १ सेंकदापासून २७ एप्रिल २०१५ रोजी रात्री बारा वाजून एक सेकंदापर्यंत उपलब्ध होणार नाही, असे म्हटले आहे.
अल जझिरा या वृत्तवाहिनीने २०१३ व २०१४ च्या प्रसारणात भारताचा नकाशा चुकीचा दाखवल्याचे माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या लक्षात आले. त्यामुळे ही बाब सव्‍‌र्हेयर जनरल ऑफ इंडियाच्या (एसजीआय) लक्षात आणून देण्यात आली. एसजीआयच्या मते भारताच्या जम्मू-काश्मीरचा काही भाग (पाकव्याप्त काश्मीर व अक्साय चीन) भारतात दाखवला नव्हता. लक्षद्वीप व अंदमान बेटे भारताच्या नकाशात दाखवली नव्हती. एसजीआयने म्हटले आहे, की हे नकाशे एसजीआयच्या मानकानुसार नाहीत व ही बाब राष्ट्रीय नकाशा धोरण २००५ च्या विरोधात आहे. संरक्षण मंत्रालयाने नकाशा नियंत्रण धोरण जाहीर केले आहे, त्यानुसार बघितले तरी अल जझिरा वाहिनीने दाखवलेले नकाशे चुकीचे होते व त्यावर त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. त्यांनी दाखवलेले नकाशे ग्लोबल न्यूज प्रोव्हायडर्सच्या सॉफ्टवेअर वर तयार करण्यात आले होते. वाहिनीने असा दावा केला, की भारत सरकारने ज्या सूचना केल्या आहेत, त्यानुसार भारत व पाकिस्तानचे नकाशे संयुक्त राष्ट्रांच्या नकाशांशी ताडून पाहिले जातील. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या आंतरमंत्री समितीने अल जझिराचे भारतातील प्रसारण पाच दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला.