अल कायदाचा म्होरक्या कासिम अल रिमी हा येमेनमध्ये अमेरिकी दलांनी केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत मारला गेला असल्याच्या माहितीस अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुजोरा दिला आहे. अरेबियन द्वीपकल्पात रिमी याने अल कायदाची स्थापना केली होती.

अमेरिकेतील नौदल तळावर करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी अल कायदाने घेतली होती. रिमी (वय४६) हा अल कायदाचा प्रमुख अयमान अल जवाहिरी याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा दहशतवादी होता. अमेरिकेत हव्या असलेल्या दहशतवाद्यांत त्याचे नाव होते. २०१५ मध्ये रिमी याने येमेनमधील अल कायदाची धुरा हाती घेतली होती. अमेरिकी सरकारने त्याला पकडण्यासाठी १ अब्ज डॉलर्सचे इनाम जाहीर केले होते.

अल कायदामुळे अमेरिकेला धोका होता, त्यामुळे रिमी मारला गेला हे चांगलेच झाले असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

रिमी हा १९९० मध्ये अल कायदात दाखल झाला होता. ओसामा बिन लादेनसाठी त्याने अफगाणिस्तानातही काम केले. त्याच्याच नेतृत्वाखाली अरबी द्वीपकल्पात येमेनी नागरिकांविरोधात मोठा हिंसाचार घडवला गेला. अमेरिकेच्या सैन्य दलांवरील अनेक हल्ल्यात तो सामील होता, तो मारला गेल्याने अमेरिका व मित्र देश आता  काही प्रमाणात सुरक्षित झाले आहेत. दहशतवाद्यांना शोधून ठार मारण्याचे काम आम्ही करत राहू असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.