पाकिस्तानच्या अनियंत्रित अशा आदिवासी क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेल्या अल- कायदाच्या अमेरिकन सदस्याला अमेरिकेतील न्यायालयाने अमेरिकी लष्कराच्या तळावरील हल्ल्यासह अफगाणिस्तानातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमधील सहभागासाठी दोषी ठरवले आहे. एकूण ९ गुन्ह्य़ांसाठी दोषी ठरवण्यात आलेल्या मोहम्मद महमूद अल-फारेख याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

अल-कायदाच्या एका अमेरिकी सदस्याला आज अमेरिकेतील न्यायालयात आणण्यात आले होते. २००९ साली अफगाणिस्तानातील एका लष्करी तळावर वाहनाच्या साहाय्याने झालेल्या आयईडी स्फोटात त्याचा सहभाग असल्याचे  न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरून सिद्ध झाले, असे प्रभारी साहाय्यक अ‍ॅटर्नी जनरल बोएंट यांनी सांगितले.

न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, अल-कायदात सहभागी होण्यासाठी परदेशी जाण्यापूर्वी फारेख हा कॅनडातील मानिटोबा विद्यापीठाचा विद्यार्थी होता. जगभरातील अमेरिकी फौजांविरुद्ध लढण्याच्या उद्देशाने २००७ साली तो २ सहकारी विद्यार्थ्यांसह पाकिस्तानात गेला.

हिंसाचारी जिहादला प्रोत्साहन देणारे व्हिडीओ रेकॉर्डिग्ज पाहून आणि जिहादवरील व्याख्याने ऐकून फारेख व त्याचे सहकारी कट्टर बनले. ते अफगाणिस्तानच्या सीमेवरील अल-कायदाचा कारवायांचा मुख्य तळ असलेल्या पाकिस्तानच्या उत्तरेकडील आदिवासी भागात गेले. तेथे त्यांनी अल-कायदात सहभागी होऊन त्या संघटनेकडून प्रशिक्षण घेतले, असा फेडरल प्रॉसिक्युटर्सचा आरोप होता.

फारेखच्या सहकाऱ्यांपैकी फेरिद इमाम याने सप्टेंबर २००८ मध्ये पाकिस्तानातील अल-कायदाच्या प्रशिक्षण शिबिरात शस्त्रे आणि लष्करसदृश प्रशिक्षण दिले होते.