भारतीय उपखंडातील अल-कायदा संघटनेशी संबंध असलेल्या आणखी एका व्यक्तीला गुरुवारी उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्य़ातून अटक करण्यात आल्यामुळे या संदर्भात अटक झालेल्यांची संख्या तीन झाली आहे. या अटकांच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी उत्तर प्रदेशात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
झफर मसूद नावाच्या या आरोपीला पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक ठिकाणी छापे घालत असलेल्या विशेष विभागाच्या पथकाने अटक केली. संभलचाच रहिवासी असलेला मोहम्मद आसिफ (४१) याला उत्तर दिल्लीतील सलीमपूर येथून, तर एका मदरशातील शिक्षक मौलाना अब्दुल रहमान (३७) याला जगतपूर येथून अटक करण्यात आली. यांना बुधवारी अटक झाल्यानंतर मसूदला पकडण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
असिफ हा अल-कायदाचा भारतातील दहशतवादी असल्याबाबत काही पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. मसूदची संघटनेतील भूमिका तपासण्यासाठी त्याचीही चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी भडकावल्याच्या आरोपाखाली पकडलेल्या मौलाना अब्दुल रहमान व झफर मसूद या दोघांना दिल्लीच्या एका न्यायालयाने गुरुवारी १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.