अल कायदाच्या येमेनमधील गटाने शार्ली एब्दो व्यंग्यचित्र साप्ताहिकावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे बुधवारी जाहीर केले आहे. याआधी अल कायदाने या हल्ल्याबाबत आनंद व्यक्त केला होता, मात्र जबाबदारी स्वीकारली नव्हती.
अल कायदाच्या अरेबियन खंडातील गटाचे नेते नसर अल-अंसी यांनी ही जबाबदारी स्वीकारणारी व्हिडीओ चित्रफीत जारी केली आहे.
विशेष म्हणजे शार्ली एब्दोवरील हल्ल्यानंतर दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या ५० जणांवर फ्रान्स पोलिसांनी कारवाई केली आहे. शार्ली एब्दोच्या जोडीने कोशर मार्केटवर हल्ला करणारा अतिरेकी हा ‘इस्लामिक स्टेट’ संघटनेचा समर्थक होता. त्यामुळे फ्रान्स पार्लमेंटच्या कनिष्ठ सभागृहाने इराकमधील या संघटनेच्या तळांवर हवाई हल्ल्यांत वाढ करण्याचा प्रस्तावही बुधवारी संमत केला.