पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्लामविरोधी असल्याची प्रतिमा निर्माण करण्याचा या संघटनेचा प्रयत्न दिसतो, असे भाकीत अमेरिकेतील संरक्षणतज्ज्ञांनी वर्तवले आहे. असे असले तरीही भारताने अतिरेकी संघटनेच्या इशाऱ्यास पुरेशा गांभीर्याने घेणे गरजेचे आहे, असे मत अमेरिकेतील दहशतवादविरोधी तज्ज्ञ आणि सीआयए या गुप्तचर संघटनेतील निवृत्त विश्लेषक ब्रूस रिडल यांनी नोंदवले आहे. मात्र, भारतात सक्रिय होण्याची घोषणा करणाऱ्या अल कायदा या अतिरेकी संघटनेचा भारताला ‘तितकासा’ धोका नाही, असा दावा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने केला आहे.
अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरी याने भारताकडे मोर्चा वळवीत असल्याची धमकी देणारी ध्वनिचित्रफीत गुरुवारी प्रसिद्ध केली. अफगाणिस्तानपासून म्यानमापर्यंत शरिया कायदा लागू करण्यासाठी काश्मीर, आसाम आणि अगदी गुजरातमध्येही अल कायदा सक्रिय झाली असल्याचा इशारा जवाहिरी याने दिला. त्याबाबत बोलताना रिडल यांनी काही बाबींकडे लक्ष वेधले. पाकिस्तानातील या अतिरेकी संघटनेचे बस्तान, लष्कर ए तैयबा या संघटनेकडून त्यांना मिळणारे सहकार्य हे भारतासाठी धोकादायक ठरू शकते, असे मत रिडल यांनी नोंदवले.
भारतात नव्याने आलेले सरकार आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इस्लामविरोधी प्रतिमा निर्माण करण्याचा अल कायदाचा प्रयत्न असू शकतो. त्यामुळेच या इशाऱ्याकडे पंतप्रधानांनी आणि भारताने गांभीर्याने पाहावे, असे आवाहन या संरक्षण व सामरिक तज्ज्ञाने केले. मात्र अद्यापही या ध्वनिचित्रफितीची सत्यासत्यता पडताळता आलेली नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
 
अमेरिकेचा मात्र वेगळाच सूर
सीआयएतील निवृत्त विश्लेषक ब्रूस रिडल यांच्या मताशी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने पूर्णपणे असहमती दर्शवली आहे. अल कायदाची ही सक्रियता फारशी धोकादायक नाही. या भागत ही अतिरेकी संघटना अन्य काही अतिरेकी संघटनांच्या रूपात अनेक वर्षे सक्रिय आहे, असे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या कॅटलीन हेडन यांनी म्हटले आहे.
म्हणून धोका अधिक..
९/११ जवळ आली असतानाच अयमान जवाहिरीकडून ही ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध झाल्याने त्याचे गांभीर्य अधिक वाटते. यामुळे पाश्चिमात्य आणि भारतीय गुप्तचर खात्यांवर अधिक जबाबदारी येऊन पडली आहे. मात्र भारत अमेरिका आणि अफगाणिस्तान या दोन्ही राष्ट्रांशी सामरिक तसेच संरक्षण विषयक सहकार्य करेल, अशी आमची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया ‘मिडल इस्ट मीडिया रिसर्च इन्स्टिटय़ूट’मधील जिहाद आणि दहशतवादाचे अभ्यासक तुफैल अहमद यांनी दिली.