अल काईदा ही अतिरेकी संघटना भारतात नवीन शाखा सुरू करीत असली तरी त्याचा अर्थ त्या संघटनेला काही नवीन क्षमता प्राप्त होतील, असा नसून भारताला त्यामुळे मोठा धोका नाही. कारण अल काईदाचे कंबरडे मोडण्यास आम्ही समर्थ आहोत असे अमेरिकेने म्हटले आहे.
व्हाईट हाऊस येथे राष्ट्रीय सुरक्षा मंडळाचे प्रवक्ते केटलिन हेडन यांनी सांगितले की, अल काईदाने जरी भारतात विस्ताराची घोषणा केली असली तरी त्याला फार महत्त्व देण्याचे कारण नाही कारण त्यामुळे त्यांना काही नवीन क्षमता प्राप्त होणार नाहीत. ती संघटना या भागात अगोदरच कार्यरत आहे.अल काईदा भारतीय उपखंडात नवी शाखा सुरू करणार असल्याच्या बातम्या आम्ही पाहिल्या पण अल काईदाचा धोका अमेरिकेलाही आहे त्यामुळे अमेरिकी लोकांचे जीव धोक्यात येऊ नयेत म्हणून आम्ही अल काईदाचे कंबरडे मोडण्यास समर्थ आहोत असे ते म्हणाले. आशियात भारताची दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी मोठी भागीदारी आहे त्यामुळे त्यांना भारतात मोकळे रान मिळेल असे समजण्याचे कारण नाही. २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर अमेरिका व भारत यांच्यातील दहशतवादविरोधी सहकार्य वृद्धिंगत झाले आहे. त्या हल्ल्यात १६६ जण मारले गेले होते व त्यात सहा अमेरिकी लोक होते. अल कायदाला आम्ही त्या भागात पुरेसे नेस्तनाबूत केले आहे, असा दावा हेडन यांनी केला. भारतात कैदत अल जिहाद या नव्या गटाची स्थापना अल काईदा ही अतिरेकी संघटना करीत असल्याच्या वृत्तावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. अल काईदाची माध्यम संस्था असलेल्या सहाबने नवीन गट स्थापन करीत असल्याची घोषणा केली. अल काईदा ही संघटना अफगाणिस्तान व पाकिस्तान या दोन देशात कार्यरत आहेत.