गेल्या पंचवीस वर्षांत प्रथमच अमेरिकेतील अलाबामा राज्यातून सिनेटची जागा जिंकताना डेमोक्रॅटिक पक्षाचे डग जोन्स यांनी अध्यक्ष ट्रम्प यांचे समर्थन असलेले उमेदवार रॉय मूर यांचा पराभव केला. मूर यांच्यावर किशोरवयीन मुलामुलींशी लैंगिक गैरवर्तन केल्याचे आरोप होते. मूर यांचा पराभव हा ट्रम्प यांना मोठा धक्का आहे. ट्रम्प यांनी मूर यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती. लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपानंतर अनेक रिपब्लिकनांनी मूर यांच्यापासून दूर राहणेच पसंत केले होते. ट्रम्प यांनी सार्वजनिक वक्तव्ये व ट्विटच्या माध्यमातून मूर यांना पाठिंबा दिला होता. अलाबामाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जोन्स यांना ४९.९२ तर मूर यांना ४८.३९ टक्के मते पडली आहेत. अलाबामाचा मी आभारी आहे असे जोन्स यांनी म्हटले आहे. नवीन सिनेटर जोन्स यांचा शपथविधी पुढील वर्षी होणार आहे. अलाबामा या रिपब्लिकनांच्या बालेकिल्ल्यात डेमोक्रॅटिक पक्षाने सिनेटची जागा जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. जोन्स यांचा अनपेक्षित विजय हा सिनेटमध्ये रिपब्लिकनांची आघाडी कमी करणारा असून आता ५१-४९ असे बलाबल आहे. ९९ टक्के मते मोजली गेल्यानंतरही मूर यांच्या आशा मावळल्या नव्हत्या. १९७० मध्ये मूर यांनी वयाच्या तिशीत अनेक किशोरवयीन मुलींचा विनयभंग केला होता ते आरोप त्यांनी फेटाळले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचा हा मोठा विजय असल्याचे ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे. जोन्स यांचा विजय म्हणजे रिपब्लिकन पक्षाला धक्का आहे असे ‘दी वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे.

पंचवीस वर्षांनी डेमोक्रॅटिक पक्षास यश

जोन्स यांच्या रूपाने १९९२ नंतर अलाबामातून सिनेटवर प्रथमच डेमोक्रॅट सदस्याची निवड झाली आहे. अतिशय अटीतटीच्या लढतीतील विजयाबद्दल जोन्स यांचे अध्यक्ष ट्रम्प यांनी अभिनंदन केले आहे.