आयसीआयसीआय बँकेच्या मुख्याधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. सीबीआयने शुक्रवारी व्हिडीओकॉनचे वेणुगोपाल धूत समवेत कोचर दाम्प्त्यांविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे.

चंदा कोचर यांचे पती दीपक आणि व्हिडीओकॉनचे प्रमुख धूत यांनी वर्ष २००८ मध्ये ५०-५० टक्के भागिदारीत न्यूपॉवर रिन्यूएबल्स प्रा. लि.ची (एनआरपीएल) स्थापना केली होती. परंतु, धूत यांनी एक महिन्यानंतर कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आणि यातील आपले भाग दीपक यांच्या नावावर हस्तांतरित केले. त्यानंतर २०१० मध्ये धूत यांच्या मालकीच्या सुप्रीम एनर्जी प्रा. लि.ने एनआरपीएलला ६४ कोटी रूपयांचे कर्ज दिले. त्याबदल्यात न्यूपॉवरचे भाग सुप्रीम एनर्जीच्या नावे हस्तांतरित करण्यात आले.

सुप्रीम एनर्जी मार्च २०१० पर्यंत न्यूपॉवरमध्ये ९४.९९ टक्क्यांची भागीदार होती. उर्वरित ४.९९ टक्के भाग दीपक यांच्याकडे राहिली. वर्ष २०१० ते २०१३ दरम्यान सुप्रीम एनर्जीचे संपूर्ण भाग आधी महेश पुंगलिया यांना आणि नंतर दीपक यांच्या मालकीच्या एका ट्रस्टला नऊ लाखात हस्तांतरित करण्यात आले.

याचदरम्यान २०१२ मध्ये व्हिडीओकॉनला आयसीआयसीआयबँकेने ३२५० कोटी रूपयांचे कर्ज मंजूर केले होते. यामध्ये २८४९ कर्ज अजूनही थकीत आहे. आता हे कर्ज एनपीएमध्ये गेल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

लुकआऊट नोटीस म्हणजे काय?
एखाद्या संशयित व्यक्तीला देशाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी तपास यंत्रणांकडून विमानतळ इमिग्रेशन विभागाला लुकआऊट नोटीस पाठवली जाते.