ओदिशामधील केंद्रपारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्यावर मगरीने हल्ला केला. मात्र या शेतकऱ्याने प्रसंगावधान दाखवत या आठ फुटी लांब मगरीच्या तावडीतून स्वत:ची सुटका केली. यासंदर्भातील माहिती वन अधिकाऱ्यांनीच दिली आहे.

५८ वर्षीय ब्रिजकृष्णा प्रधान हे जलकाना गावाजवळील खाडीमध्ये मासेमारी करत होते. प्रधान एका छोट्या बोटीमध्ये उभे राहून मासेमारी करत असतानाच एका आठ फूट लांब मगरीने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये प्रधान जखमी झाले. मगरीने केलेल्या हल्ल्यात त्यांच्या उजवा हात तिच्या जबड्यात अडकल्यानंतरही त्यांनी धीर सोडला नाही. मगरीच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करताना त्यांच्या डाव्या हाताला एक बांबू लागला. त्यांनी तो बांबू थेट मगरीच्या डोळ्यावर मारला. त्यामुळे मगरीने आपल्या जबड्यातील त्यांचा हात सोडला आणि ती पुन्हा पाण्यात गेली.

प्रधान हे संरक्षित वनक्षेत्रातील खाडी परिसरामध्ये मासेमारी करत होते. अशा परिसरामध्ये मगरी आणि इतर जलचर असण्याची दाट शक्यता असते अशी माहिती महाकालपाडा वनक्षेत्राचे अधिकारी बिजॉय कुमार परिदा यांनी दिली. वन खाते अशाप्रकारे समान्यांवर खाडी परिसरामध्ये मगरींनी आणि इतर प्राण्यांनी हल्ला करु नये म्हणून शक्य त्या सर्व उपाययोजना करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. स्थानिकांनी खाडीच्या पाण्यात जाऊ नये अशा सुचना करण्यात आल्या आहेत. खाडी किनारी असणारे घाट हे धोकादायक असल्याने तेथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे.