अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्यावर महाभियोग दाखल होऊ शकतो या धोक्याची कल्पना आधीच दिली होती, असा दावा व्हाइट हाऊसचे माजी प्रमुख जॉन केली यांनी केला आहे.

केली यांनी वॉशिंग्टन एक्झामिनर या वृत्तपत्रास सांगितले की, ‘अकरा महिन्यांपूर्वीच ट्रम्प यांना महाभियोगाच्या धोक्याची सूचना दिली होती. आता नेमके तेच घडते आहे त्यामुळे वाईट वाटले. जर मी किंवा माझ्यासारखा कुणी व्हाइट हाऊसमध्ये असता तर असे घडले नसते. मी जेव्हा व्हाइट हाऊस सोडले तेव्हा अध्यक्ष ट्रम्प यांना त्या जागेवर विश्वासू व प्रामाणिक व्यक्तीची नेमणूक करण्याचा सल्ला दिला होता पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले असा याचा अर्थ आहे. मी पद सोडताना त्यांना होयबा व्यक्तीची नेमणूक करू नका, जो कुणी तुम्हाला सत्य सांगणार नाही त्याची नेमणूक करू नका असे स्पष्ट केले होते. जर तुम्ही तसे केलेत तर महाभियोगाचा धोका आहे असा इशाराही दिला होता. मी जर आज व्हाइट हाऊसचा प्रमुख असतो तर ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई झाली नसती.’

केली यांच्या वक्तव्यावर व्हाइट हाऊसच्या  प्रसिद्धी सचिव स्टिफनी ग्रिश्ॉम यांनी सांगितले की,  मी जॉन केली यांच्या समवेत काम केले आहे. त्यांना ट्रम्प यांच्यासारखा बुद्धिमान अध्यक्ष हाताळता येत नव्हता त्यांच्याबरोबर काम करण्याची त्यांची पात्रता नव्हती.

ट्रम्प यांनी स्वत यावर  खुलासा करताना सांगितले की, ‘केली यांनी महाभियोगाचा इशारा  कधीच दिला नव्हता. जर त्यांनी तसा इशारा दिलाच असता तर त्यांना मी कार्यालयातून  बाहेर काढले असते. त्यांना आता पुन्हा प्रकाशझोतात येण्याची इच्छा दिसते म्हणून ते खोटी विधाने करीत सुटले आहेत. ख्रिसमसपर्यंत ट्रम्प यांच्यावर महाभियोगासाठी कुठली कलमे लावायची यावर मतदान होईल नंतर सिनेटने त्यांना पदावरून काढायचे की नाही याचा निर्णय घ्यायचा आहे.’

डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार व माजी उपाध्यक्ष जो बिदेन यांची चौकशी करण्याचा तगादा अध्यक्ष ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्हालोदिमीर झेलेन्स्की यांच्या मागे लावला होता व तसे केले नाही तर युक्रेनची लष्करी मदत बंद करण्याची धमकीही दिली.