अल्जेरियामध्ये लष्करी विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात २५० जण ठार झाले आहेत. अल्जेरियाची राजधानी बोयुफारीक विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर लगेचच हे विमान शेतामध्ये कोसळले. अपघाताच्यावेळी Ilyushin Il-78 या लष्करी वाहतूक विमानामध्ये मोठया प्रमाणावर सैनिक होते. २५७ जण या विमान अपघातात ठार झाल्याचे अल्जेरियामधील वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

कोसळल्यानंतर लगेचच या विमानाने पेट घेतला. सध्या अपघाताची जी छायाचित्र समोर आली आहेत त्यामध्ये आगीच्या ज्वाळा, काळया धुराने परिसर व्यापून टाकल्याचे दिसत आहे. रशियन बनावटीचे हे Ilyushin Il-78 वाहतूक विमान दक्षिण-पश्चिमेला बीचरच्या दिशेने चालले होते. वेस्टर्न सहारा पोलीसारीयो चळवळीचे सदस्यही या अपघातात ठार झाले आहेत. पोलीसारीयोचे २६ सदस्य या विमानामध्ये होते. अल्जेरियाच्या शेजारी वेस्टर्न सहारा प्रांत असून त्याच्या स्वातंत्र्यासाठी हे सदस्य लढत होते.

घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु झाले असून १४ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. बोयुफारीक उत्तर अल्जेरियात असून भूमध्य समुद्रापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये अल्जेरियन एअरफोर्सचे लॉकहीड सी-१३० हरक्युलस विमान पूर्व अल्जेरियाच्या पर्वतरांगांमध्ये कोसळले होते. त्या दुर्घटनेत ७७ जणांचा मृत्यू झाला होता.